विद्या प्रतिष्ठानचे महाविद्यालय स्वच्छतेत देशात दुसरे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 02:34 AM2017-09-15T02:34:34+5:302017-09-15T02:34:46+5:30
‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवरील शिक्षणसंस्थांची स्वच्छता मानांकने जाहीर करण्यात आली. या मानांकनात विद्याप्रतिष्ठानच्या आटर््स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजने स्वच्छता मानांकनात देशात दुसरे स्थान पटकावले.
बारामती : ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशपातळीवरील शिक्षणसंस्थांची स्वच्छता मानांकने जाहीर करण्यात आली. या मानांकनात विद्याप्रतिष्ठानच्या आटर््स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजने स्वच्छता मानांकनात देशात दुसरे स्थान पटकावले.
देशभरातील साडेतीन हजार शिक्षणसंस्थांनी या स्पर्धेसाठी आॅनलाईन अर्ज केला होता. महाराष्ट्रातील केवळ याच कॉलेजला मानांकन यादीत स्थान मिळविण्याचा मान मिळाला आहे.
दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार आणि आटर््स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमाला यूजीसीचे चेअरमन डॉ. वीरेंदरसिंग चौहान, एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते. देशात सुरू असणाºया स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या वतीने पाच वेगवेगळ्या विभागांसाठी देशातील एकूण ४० हजार शिक्षणसंस्थांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते. या अभियानाला प्रतिसाद देऊन देशातील सुमारे साडेतीन हजार शिक्षणसंस्थांनी या स्पर्धेत भाग घेतला. या अर्जांतील गुणांकनात सरस असणाºया १७४ शिक्षणसंस्थांना दिल्लीला बोलावण्यात आले होते. निमंत्रित करण्यात आलेल्या या निवडक १७४ शिक्षणसंस्थांपैकी २५ संस्था पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या.