बँक्स फेडरेशनच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत पुणे विभागात अनास्कर आणि ढेरे विजयी
By श्रीकिशन बलभीम काळे | Published: November 15, 2022 11:41 AM2022-11-15T11:41:38+5:302022-11-15T11:42:09+5:30
ढेरे यांना काळे यांचेपेक्षा केवळ एक मत जास्त मिळाल्याने ते निवडून आले..
पुणे : अत्यंत चुरशीने झालेल्या दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनच्या निवडणुकीत पुणे-अहमदनगर-सोलापूर मतदारसंघातून फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष विद्याधर अनास्कर व पुणे मर्चेंट्स को-ऑप. बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे हे निवडून आले आहेत.
कॉसमॉस को-ऑप. बँकेचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद काळे हे पुणे विभागातून निवडणूक लढवित असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ४४ पैकी ४३ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी दोन मते बाद झाली. उर्वरित ४१ मतांपैकी अनास्कर यांना ३२, ढेरे यांना २०, मिलिंद काळे यांना १९ तर आनंद गावडे यांना १० मते मिळाली. ढेरे यांना काळे यांचेपेक्षा केवळ एक मत जास्त मिळाल्याने ते निवडून आले.
फेडरेशनची निवडणूक बिनविरोध करण्याचे विद्यमान संचालकांनी निश्चित केले होते. त्यानुसार सर्वानुमते २१ पैकी १२ जागा बिनविरोध पार पाडल्या. परंतु उर्वरित ९ जागांवर अर्ज मागे घेण्याचे दिलेले आश्वासन विरोधकांनी न पाळल्याने निवडणूक लादली गेली.
निवडणूक झालेल्या ९ जागांपैकी मुंबई येथील ३, पुणे येथील २ तर कोकण विभागातील १ अशा ६ जागांवर अनास्करांच्या पॅनेलला विजय मिळाला. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. नागरी सहकारी बँकांसाठी आम्ही चांगले कार्य करू, असे आश्वासन विद्याधर अनास्कर यांनी दिले आहे.