‘विघ्नहर’ कारखाना करणार ११ लाख टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:24+5:302021-09-23T04:13:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी सुमारे ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ...

The Vighnahar factory will grind 11 lakh tonnes of sugarcane | ‘विघ्नहर’ कारखाना करणार ११ लाख टन उसाचे गाळप

‘विघ्नहर’ कारखाना करणार ११ लाख टन उसाचे गाळप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नारायणगाव : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी सुमारे ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी ऊस तोडणी व गाळपाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. नोंद झालेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत विघ्नहर कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज राहणार आहे, अशी माहिती विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी दिली.

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३६ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नि प्रदीपन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कुंडलिक ऊर्फ पप्पूशेठ हाडवळे व त्यांच्या पत्नी सुनिता हाडवळे या उभयतांच्या हस्ते आणि अध्यक्ष सत्यशिल शेरकर आणि उपाध्यक्ष अशोक घोलप व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी यांच्या उपस्थितीत निवृत्तीनगर (ता.जुन्नर) येथे पार पडले.

शेरकर म्हणाले की, यावर्षी कारखान्याने सुमारे ११ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. नोंद झालेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्यात येणार आहे. याकामी सर्व सभासद, ऊस उत्पादकांनी सहकार्य करावे, कारखान्याची ऑफ सिझनमधील सर्व मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण केलेली आहेत. यावर्षी विघ्नहर कारखान्यामध्ये अनेक छोटी मोठी मॉडीफिकेशनची कामे केली असून, ती लवकरच पूर्ण होतील, साखर कामगारांना १२ टक्के पगारवाढ जाहीर झाली, तसेच त्यासोबत कामगारांना फरक पगाराची रक्कमही मिळणार आहे. पगारवाढीचे साखर संघ, कारखाना, कामगार संघटना यांचे बरोबर करार लवकरच होतील. हा विषय संचालक मंडळापुढे येईल, त्यावेळी विघ्नहरचे संचालक मंडळ योग्य निर्णय घेतील, अशी ग्वाही शेरकर यांनी दिली.

प्रास्ताविक व स्वागत करताना कार्यकारी संचालक भास्कर घुले म्हणाले की, सध्या साखर कारखानदारीला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांच्या हिताची जपणूक करणे ही विघ्नहर कारखान्याची परंपरा असून, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांच्या विश्वासाच्या जोरावर आगामी २०२१-२०२२ चा गाळप हंगाम कोणत्याही प्रकारची अडचण येऊ न देता यशस्वीरीत्या पार पाडणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी संचालक मंडळाला दिली.

याप्रसंगी धोलवडच्या सरपंच पौर्णिमा भोर, धनगरवाडी ग्रामपंचायत सदस्य योगिता शेळके आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी केले. संचालक धनंजय डुंबरे यांनी आभार मानले.

चौकट

विघ्नहर कारखाना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार कोरोनामुळे दोन वर्षांपासून होऊ शकला नाही. त्यामुळे या कार्यक्रमात सेवानिवृत्त ५४ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सार्वजनिक जीवनात समाजकार्य करणारे १९ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचा विघ्नहर कारखान्याकडून सत्कार करण्यात आला.

फोटो ओळ - श्री विघ्नहर कारखान्याच्या ३६ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्नि प्रदीपन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कुंडलिक ऊर्फ पप्पूशेठ हाडवळे व त्यांच्या पत्नी सुनिता हाडवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप व सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक भास्कर घुले आणि कर्मचारी उपस्थित होते .

Web Title: The Vighnahar factory will grind 11 lakh tonnes of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.