Pune Crime| इंदापुरात साडे अठ्ठावीस किलो गांजासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 04:39 PM2022-07-06T16:39:44+5:302022-07-06T17:59:12+5:30
इंदापूर ( पुणे ) : इंदापूर शहरातील बाह्यवळन महामार्ग, महात्मा फुले चौक येथे रस्त्यात अपघातग्रस्त कार जागेवरच सोडून चालक व ...
इंदापूर (पुणे) :इंदापूर शहरातील बाह्यवळन महामार्ग, महात्मा फुले चौक येथे रस्त्यात अपघातग्रस्त कार जागेवरच सोडून चालक व मालक फरार झाल्याने सदरची कार ताब्यात घेऊन तिची तपासणी केली. सदर कारच्या मागील डीक्कीमध्ये अवैध २८.५ किलो गांजा सापडल्याने खळबळ उडाली. इंदापूर पोलिसांनी कार व गांजा पंचासमक्ष जप्त करून अज्ञात कारचालक व मालक यांच्याविरूद्ध अमली पदार्थ तस्करी व अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला असल्याची माहिती इंदापूर वरिष्ठ पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर यांनी दिली.
अपघातग्रस्त टोयटा कार ही पांढर्या रंगाची (आर.जे.०६, सी.ई.९२२८) आहे. तिथे आढळलेली कार ही गुजरात पासिंगची आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, तुकाराम महाराज पालखी मुक्काम इंदापुरात असल्याने इंदापूर पोलीस प्रशासनाकडून पेट्रोलिंग चालु होते, नाईट राऊंड तसेच बंदोबस्त पाॅइंट चेक करत असताना इंदापूर पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून महात्मा फुले चौक सर्कल नजिक सर्विस रोडलगत एक टोयटा कार अपघातग्रस्त बेवारस स्थितीत असल्याचे समजले. सदर ठिकाणी इंदापूर पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता अपघातग्रस्त कारच्या मागील बाजुकडून अतिशय उग्र वास येत असल्याचे जाणवले.
पोलिसांनी सदर कारची पंचासमक्ष तपासणी केली असता कारच्या मागील बाजुच्या डीक्कीत शासनाने बंदी घातलेला अंमली पदार्थ गांजा असल्याचे आढळून आले. सदरची कार ही मुद्देमालासह जप्त करून त्यातील गांजा या अंमली पदार्थाचे मोजमाप केले असता त्याचे वजन २८.५ किलो इतके भरले. त्याची शासकीय नियमानुसार ६ लाख रूपये इतकी किंमत आहे. तर अपघातग्रस्त टोयटा कारची किंमत १२ लाख होत असून ६ लाख रूपये किंमतीच्या गांजासह एकुण १८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही इंदापूर वरिष्ठ पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर, सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील, ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, दाजी देठे, सहा. फौजदार नितिन तांबे, युवराज कदम, पोलीस नाईक जगदिश चौधर, बापू मोहिते, सलमान खान, मोहम्मदअली मड्डी, विशाल चौधरी, विकास राखुंडे या पथकाने केली.