पुण्यातील तरूणाची दक्षता अन् पोलिसांच्या तत्परतेने वाचले लोणावळ्यातील तरूणाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 08:36 PM2021-10-21T20:36:00+5:302021-10-21T20:44:43+5:30

मी घरगुती कारणावरून आत्महत्या करायला निघालो आहे, असा फेसबुकवर लोणावळ्यातील तरूणाने व्हिडीओ टाकला. त्यांनंतर त्याच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली

vigilance youth promptness police saved the life lonavla | पुण्यातील तरूणाची दक्षता अन् पोलिसांच्या तत्परतेने वाचले लोणावळ्यातील तरूणाचे प्राण

पुण्यातील तरूणाची दक्षता अन् पोलिसांच्या तत्परतेने वाचले लोणावळ्यातील तरूणाचे प्राण

Next

पुणे: समाज जागरूक असेल आणि जोडीला प्रशासनाची तत्काळ मदत मिळाली तर एखाद्याचा प्राण वाचू शकतो. याचा प्रत्यय गुरूवारी दुपारी लोणावळा परिसरातील नांगरगाव येथे पाहायला मिळाला. दुपारी अडीचच्या सुमारास एका तरूणाने घरगुती वादाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, अशी फेसबुकवर पोस्ट टाकली. यानंतर त्या तरूणाचे नातेवाईक आणि पुण्यातील एका तरूणाने पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली. पोलिसांनीही तत्काळ दखल घेत शोध घेत वेळेवर दवाखान्यात दाखल केल्याने त्या तरूणाचे प्राण वाचू शकले.

‘मी घरगुती कारणावरून आत्महत्या करायला निघालो आहे, असा फेसबुकवर लोणावळ्यातील तरूणाने व्हिडीओ टाकला. त्यांनंतर त्याच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. ही पोस्ट पाहून त्या तरूणाचे पुण्यात नोकरीला असलेल्या चुलत्यांनी सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणाऱ्या हर्षल लोहकरे यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली.

हर्षल लोहकरने ग्रामीण पोलीस दलातील अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे आणि लोणावळा पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी आपल्या पथकासह १५ मिनिटांत त्या तरूणाच्या घरी जाऊन पाहणी केली. मात्र, हा तरूण तेथे आढळला नाही. शोध घेत असताना तो नांगरगाव परिसरात बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला. त्याला लगेचच नजिकच्या रूग्णालयात दाखल केले. या तरूणाने कोणते तरी औषध प्राशन केल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी उपचार करून शुद्धीवर आणले. साधरण दुपारी अडीचच्या दरम्यानची ही घटना असून केवळ अर्ध्या तासात घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ दखल घेतल्याने त्या तरूणाला जीवदान मिळाले असून तो धोक्याच्या बाहेर असल्याचे अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांनी सांगितले.

आज २१ ऑक्टोबर आहे. आजच्या दिवशी शहिद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली संपूर्ण पोलीस दल वाहत असते. आजच्या दिवशी आत्महत्या करायला निघालेल्या तरूणाचे तत्काळ दखल घेत रूग्णालयात दाखल करून प्राण वाचवण्यात यश आले. त्या तरूणाच्या कुटंबावर भविष्यात येणारा अंधार दूर करता आला. ही सर्वच पोलिसांना समाधान देणारी बाब आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे.

- मितेश गट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

Web Title: vigilance youth promptness police saved the life lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.