विघ्नहराचे दर्शन आता आॅनलाईन घेता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 08:18 PM2018-08-01T20:18:41+5:302018-08-01T20:25:15+5:30
अंगारकी संकष्टी चतुर्थीचे निमित्त साधून मंगळवारी ‘शेमारू भक्ती’ या आॅनलाईन अॅपचा शुभारंभ करण्यात आला.
ओझर : शिर्डी, बालाजी, पंढरपूर या देवस्थानांच्या धर्तीवर आता अष्टविनायकातील ओझर येथील श्री विघ्नहराचे दर्शनही आता आॅनलाईन घेता येणार आहे. मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीचे निमित्त साधून ‘शेमारू भक्ती’ या आॅनलाईन अॅपचा शुभारंभ करण्यात आला.
या अॅपच्या माध्यमातून श्रींच्या थेट दर्शनाबरोबर आॅनलाईन पूजा, अभिषेक आॅनलाईन प्रार्थना, आॅनलाईन प्रसाद मागविणे, श्रींच्याचरणी आॅनलाईन नवस करणे, देवस्थानच्या विकासकामांना देणगी देणे या सुविधा गणेशभक्तांना घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. विविध डीटीएच वाहिन्यांच्या माध्यमातून श्री विघ्नहराची आरती आॅनलाईन प्रसारित केली जाणार आहे. अष्टविनायकांमध्ये सर्वप्रथम ओझर या ठिकाणी देवस्थानने गणेशभक्तांना ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे यांनी सांगितले.
आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या हस्ते या अॅपचा शुभारंभ करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, शेमारू कंपनीचे सीओओ क्रांती गडा, प्रसन्ना पाटील, विजय कदम, जिल्हा युवासेनाप्रमुख गणेश कवडे, सरपंच अस्मिता कवडे, माजी अध्यक्ष नवनाथ कवडे, माजी सरपंच जगन्नाथ कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, साहेबराव मांडे, गोविंद कवडे, बबन मांडे, मंगेश मांडे, कैलास घेगडे, देवस्थानचे सर्व विश्वस्त यावेळी उपस्थित होते. सुविधा राजवाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.