महाराष्ट्र केसरी अधिवेशनसाठी दौंडमधील पिंपळाचीवाडी येथे जय्यत तयारी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:31 IST2025-01-07T18:31:00+5:302025-01-07T18:31:45+5:30
व्यासपीठाची बांधणी तसेच गादी व माती विभागातील कुस्त्यांसाठी मैदान तयार करण्याची जय्यत तयारी सुरू

महाराष्ट्र केसरी अधिवेशनसाठी दौंडमधील पिंपळाचीवाडी येथे जय्यत तयारी सुरु
भांडगाव : खोर (ता. दौंड) येथील पिंपळाचीवाडी येथे होणाऱ्या दौंड तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेच्या जय्यत तयारीला आता वेग आला आहे. मैदानाचे सपाटीकरण, व्यासपीठाची बांधणी तसेच गादी व माती विभागातील कुस्त्यांसाठी मैदान तयार करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. गुरुवारी (दि. ९) ही स्पर्धा होणार आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत पैलवानांची वजने घेण्यात येणार आहेत. दुपारी १२ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दौंड तालुक्यातील अनेक पैलवान या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य आयोजक व दौंड तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे खजिनदार पैलवान सागर चौधरी यांनी दिली.
खोर पिंपळाचीवाडीसारख्या ग्रामीण भागामध्ये होणारी ही तालुकास्तरीय स्पर्धा अत्यंत उत्कृष्ट आयोजनामध्ये होणार असून याचे उद्घाटन विद्यमान आमदार व तालीम संघाचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी दौंड तालुक्यातील कोनाकोपऱ्यातून अनेक पैलवान मंडळी व वस्ताद मंडळी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. यावर्षी प्रथमच दौंड तालुका मल्ल सम्राट किताब पैलवानांना बहाल करण्यात येणार आहे. प्रत्येक वजन गटातील विजेत्या पैलवानांना चषक, प्रमाणपत्र व पदक देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत नियोजनबद्ध व तालुक्यातील कुस्तीशौकिनांना आकर्षण ठरणारी मानली जात आहे.
ही स्पर्धा तालुक्यातील कुस्ती खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारी असल्याचे मत स्पर्धा समिती अध्यक्ष ॲड. ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले आहे. धर्मवीर संभाजीराजे तालीम संघ पिंपळाची वाडी व दौंड तालुका कुस्तीगीर तालीम संघ यांच्याकडून संपूर्ण व्यवस्थापन केले जाईल.