‘जयभवानी माता’, ‘इंद्रेश्वर’चा विजय

By admin | Published: April 27, 2015 11:45 PM2015-04-27T23:45:17+5:302015-04-27T23:45:17+5:30

इंदापूर, बारामती तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय भवानीमाता पॅनलने सर्व जागा जिंकून घवघवीत यश मिळविले.

Vijay of 'Jayabhavani Mata', 'Indreshwar' | ‘जयभवानी माता’, ‘इंद्रेश्वर’चा विजय

‘जयभवानी माता’, ‘इंद्रेश्वर’चा विजय

Next

बारामती : इंदापूर, बारामती तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय भवानीमाता पॅनलने सर्व जागा जिंकून घवघवीत यश मिळविले. शेतकरी कृती समितीचे नेते, माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही.
माळेगाव कारखान्याच्या पराभवानंतर सोमेश्वर व छत्रपती या कारखान्यांच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले होते. अगदी शेवटपर्यंत तळ ठोकून ‘छत्रपती’च्या निवडणुकीला ते सामोरे गेले. त्यामध्ये त्यांना निर्विवाद यश मिळाले.
या कारखान्याच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होईल, असे चित्र होते. मात्र, सर्व २१ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने जिंकल्या. विशेष म्हणजे, अनेक वर्षे कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत राहिलेले पृथ्वीराज जाचक यांनादेखील पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला राखीव जागांच्या प्रवर्गातील मतमोजणी झाली.
‘ब’ वर्ग मतदारसंघात अनिल बागल (२४८) मते मिळवून विजयी झाले. त्यांनी विरोधी संभाजी काटे (१२५) यांचा पराभव करून राष्ट्रवादी पुरस्कृत जय भवानीमाता पॅनलचे खाते उघडले. त्यानंतर भटक्या विमुक्त प्रवर्गात तेजश्री देवकाते (१०,९४७) यांनी बाळासाहेब कोळेकर (७,८८१) यांचा पराभव केला. इतर मागासवर्गीय प्रवर्गात गोपीचंद शिंदे (११,११०) यांनी विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी दिगंबर भोपळे (७,७३५) यांचा पराभव केला. महिला गटात शोभा राजेंद्र झगडे (११,७७५), सुमन पांडुरंग दराडे (११,१३०) यांनी विजय मिळविला. त्यांनी विरोधी रूपाली देवकाते (८,००९), राजेश्री निंबाळकर (७,०९६) यांचा पराभव केला.
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात निवृत्ती सोनवणे (११,६५२) यांनी महादेव सोनवणे (७,६९९) यांचा पराभव केला. राखीव गटातील मोजणीनंतर ऊसउत्पादक गटातील १ ते ६ गटांची मोजणी करण्यात आली. गट नं. १ मध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे अमोल पाटील (१०,४९६), बाळासाहेब सपकळ (९,८१२), सर्जेराव जामदार (१०,६९१) यांनी विजय मिळविला. त्यांनी या गटात माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक (९,१९७), अर्जुन जामदार (७११७), अजित पाटील (७१०९) यांचा पराभव केला.
गट क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत प्रदीप निंबाळकर (११,२३२), रणजित निंबाळकर (११,३३९), नंदा वाबळे (१०,४३९) यांनी विजय मिळविला. या गटात शिवाजी निंबाळकर (७४३८), विलास शिरसट (६५३२), राहुल सपकळ (६४३८) यांचा पराभव झाला. गट नंबर ३ मध्ये विद्यमान अध्यक्ष अमरसिंह घोलप (११,५९८), माजी अध्यक्ष अविनाश घोलप (११,८३३) या दोन बंधूंसह दत्तात्रय सपकळ (१०,२७३) यांनी विजय मिळविला. या गटात सोपान कदम (७,४५५), तानाजी थोरात (७,३८०), हरिश्चंद्र माने (६,६४७) यांचा पराभव झाला. गट क्रमांक ४ मध्ये लक्ष्मण शिंगाडे (१०,३१५), बाळासाहेब पाटील (१०,८४६) यांनी विजय मिळविला. त्यांच्या विरोधी प्रशांत दराडे (७,०६५), गुलाबराव शिंगाडे (६,८१५) यांचा पराभव झाला. या गटात अपक्ष अण्णासाहेब नरुटे यांना ४६५ मते मिळाली. गट क्रमांक ५ मध्ये माजी अध्यक्ष प्रशांत काटे (११,०४०), नारायण कोळेकर (१०,८५१) विजयी झाले. त्यांनी विरोधी हनुमंत काटे (७,५७९), आनंद देवकाते (७,०३५) यांचा पराभव केला. गट क्रमांक ६ मध्ये संतोष ढवाण (१०,४३९), राजेंद्र गावडे (१०,८३६) यांनी विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी अ‍ॅड. राजेंद्र काळे (७,४३०), युवराज गावडे (७,०५८) यांचा पराभव झाला. माळेगाव कारखान्याच्या पराभवानंतर उमेदवार निवडीपासून ते संपूर्ण प्रचार यंत्रणा सर्वच स्तरांवर राबविण्यासाठी माजी मंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले. गावोगाव सभा, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला. (प्रतिनिधी)

४धनशक्तीने जनशक्तीवर मिळविलेला हा विजय आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्यात ६ हजार ३९६ बिगर ऊसउत्पादक सभासद आहेत. या बिगर ऊसउत्पादक सभासदांमुळे आमचा पराभव झाला. तत्कालीन आघाडी सरकारने जाणीवपूर्वक या बिगर ऊसउत्पादक सभासदांना मताचा अधिकार दिला.
४माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रचलेल हे षड्यंत्र आहे. कलम ८८ खाली नवनिर्वाचित संचालक मंडळातील ८ संचालकांवर कारवाई होणार आहे. कारवाईमध्ये या संचालकांचे पद जाणार आहे. तसेच त्यांना पुढील ६ वर्षे निवडणुका लढवता येणार नाहीत. त्यामुळे या जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. आमच्या पॅनेलला ऊसउत्पादक सभासदांनी साथ दिली आहे.
४ज्यांनी आम्हाला साथ दिली, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्याचबरोबर पराभवाने नाउमेददेखील होणार नाही. नवनिर्वाचित संचालक मंडळाला मी चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो. आता त्यांनी एफआरपीचे ४०० रुपये सभासदांना द्यावेत. ऊसउत्पादकांसाठी लढतच राहणार.

४सुरुवातीला स्वतंत्र पॅनलची घोषणा करणारे व त्यानंतर पृथ्वीराज जाचक यांच्याबरोबर एकत्रित पॅनलसाठी चर्चा केलेले माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली.
४एकाच गटात दोन बंधूंनी निवडणूक लढविली. अविनाश घोलप यांना सर्वाधिक मते मिळाली, तर माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक सर्वांत कमी मतांनी पराभूत झाले.
४शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक आणि त्यांच्या सहकार्ऱ्यांनीदेखील प्रचार सभांबरोबरच मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. बारामतीच्या मतदारांनी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलला मतदान केले.

‘कर्मयोगी’त जिंकल्या
इंद्रेश्वर पॅनलने सर्व जागा
इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध झालेल्या जागांसह सर्वच जागांवर दणदणीत विजय मिळवून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ‘कर्मयोगी’वरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सुरुवातीपासूनच एकतर्फी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत इंद्रेश्वर पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी ८ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली.
सोमवारी (दि. २७) सकाळी आठ वाजता इंदापूर महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप जगदाळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार संजय पवार यांच्या देखरेखीखाली मतमोजणीस सुरुवात झाली. सकाळी साडेनऊच्या दरम्यान ‘ब’ वर्ग सभासद प्रतिनिधी मतदार गटाची मतमोजणी पूर्ण झाली.
हर्षवर्धन पाटील यांच्या इंद्रेश्वर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार वसंत खंडू मोहोळकर यांना ४९, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भरत गुलाबराव राजेभोसले यांना १६ मते मिळाली. ३३ मतांच्या फरकाने मोहोळकर विजयी झाले.
यानंतर इंद्रेश्वर शेतकरी विकास पॅनलची विजयी आगेकूच सुरू झाली. वृत्त लिहिपर्यंत अधिकृत उमेदवार निवड जाहीर झाली नव्हती. मात्र, इंद्रेश्वर विकास पॅनलच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाल्याचे व विरोधी गटाच्या उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

४‘कर्मयोगी’चे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव पाटील यांच्या कन्या पद्माताई भोसले या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. त्यांनी मोठ्या मतांनी विजय मिळविला.
४इंदापूर बँकेचे अध्यक्ष भरत शहा यांनीदेखील घवघवीत यश मिळविले. सुरुवातीपासूनच एकतर्फी झालेल्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील इंद्रेश्वर विकास पॅनलने सर्व जागांवर बाजी मारली.
४या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवली.
४‘छत्रपती’, ‘कर्मयोगी’ची निवडणूक एकाच वेळी असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘छत्रपती’कडे अधिक लक्ष दिले. त्यामुळे ‘कर्मयोगी’ निवडणुकीतील एकतर्फी विजयाचा मार्ग सुकर झाला.
४खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीदेखील कर्मयोगीच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले होते. विरोधकांना ९०० ते १ हजार मतांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे त्यांच्या अनामत रकमादेखील जप्त झाल्या.

Web Title: Vijay of 'Jayabhavani Mata', 'Indreshwar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.