ऑक्सिजन अन् रेमडेसिविरबाबत पुरंदरशी दुजाभाव; शिवसेना नेत्याचा आघाडी सरकारवरच टीकेचा बाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 01:37 PM2021-04-19T13:37:18+5:302021-04-19T16:53:03+5:30
लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत पुरंदरशी भेदभाव होत आहे;
पुणे: कोरोनातील भयानक परिस्थितीत सुद्धा सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचवेळी माजी गृहमंत्री असलेल्या शिवसेना नेत्यानेच महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. पुरंदर तालुक्याशी कोरोना लसीकरण, रेमडेसिविर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत दुुजाभाव केला जात आहे अशी जोरदार टीका पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी केली आहे.
पुरंदर, तालुक्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यांच्यामुळे सर्वांना ऑक्सिजन आणि रेमडीसीवरचा पुरवठा होणे गरजेचे आहे. पण प्रशासनाकडून ते होऊ शकत नाही. लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत पुरंदरशी भेदभाव न होता त्यांनी तालुक्यात आणि ग्रामीण भागात दोन्हींचा सुरळीत पुरवठा करून द्यावा अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. आज सकाळी रेमडेसिविर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
शिवतारे म्हणाले, उद्धव ठाकरे व्यवस्थित कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत. महाविकास आघाडीच्या विरोधात माझा अजिबात रोष नाही. पण जिल्हा प्रशासन कोरोनाची परिस्थिती हाताळता येत नसल्याचे चित्र दिसत आहे. पुरंदर हवेलीतील भीषण परिस्थितीबाबत आम्ही पुणे जिल्हाधिकारी यांना अवगत केले होते. सासवड, जेजुरी, नीरा, फुरसुंगी, भेकराई, उरुळी, येथील दवाखान्याना रेमडीसीवरचा पुरवठा होत नसल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
सद्यस्थितीत पुरंदरमध्ये १ हजार ८०० सक्रिय रुग्ण आहेत. तर केवळ २२५ रेमडीसीवर शिल्लक राहिले आहेत. लसीकरणाबाबतही आमच्यावर अन्याय झालाय. पुरंदरमध्ये कोरोनाच जास्त धोका असताना फक्त ३४ हजार लसीकरण झालं आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र दुपटीने लसीकरण झालं आहे. प्रशासनाकडे २०० बेडसाठी परवानगी मिळावी असी मागणी करण्यात आली असून ऑक्सिजनचाही तातडीने पुरवठा झाला पाहिजे, असं शिवतारे म्हणाले.
पूर्ण तालुक्यात रुग्ण मृत्यूशी झुंज देऊ लागला आहे. जिल्हाधिकारी यांनी १५ एप्रिलला रेमडीसीवरचा पुरवठा करण्याबाबत आश्वासन दिले होते. पण ते अजूनही पूर्ण न झाल्याने मला हे आंदोलन करावे लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राजकीय ताकद मजबूत असणाऱ्या ठिकाणी रेमडीसीवरचा पुरवठा
ज्या ठिकाणी राजकीय नेते मजबूत आणि ताकदीचे आहेत. अशा ठिकाणी औषधांचा ओघ सुरू आहे. औषधांची टंचाई मला मान्य आहे. पण पुरंदर, भोर, हवेली यासारख्या तालुक्यात मरणासाठी वाऱ्यावर सोडून दिल्याची परिस्थिती आहे. असेही ते म्हणाले
जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करूनच काम करणार
सद्यस्थितीत या सर्वच तालुक्यातील परिस्थिती भीषण होत चालली आहे. प्रशासन ऑक्सिजन आणि रेमडीसीवरच्या पुरवठ्यावर लक्ष देत नसेल. तर प्रत्येक काम जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करूनच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.