"शरद पवारांकडे दूरदृष्टी पण आत्मकेंद्री राजकारणामुळे ते मागे पडले"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:29 PM2023-02-06T16:29:46+5:302023-02-06T16:36:00+5:30
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांचा घणाघात...
बारामती (पुणे) : बारामतीचा विकास म्हणजे शहराचा विकास आहे का, तालुक्यातील ३९ गावे अद्याप पाण्याविना आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या वाढदिवसी त्यांनी घरावर काळे झेंडे फडकावले होते. पंतप्रधानांसह मोठे नेते आणत शहर व परिसराचा विकास दाखवला जातो. प्रत्यक्षात तालुक्याचा विकास झाला आहे का, असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना केला.
शिवतारे यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीकडे यावेळी लक्ष वेधले. यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवतारे म्हणाले, खासदारांनी केंद्राकडून ईएसआयसी हॉस्पिटल बारामतीसाठी मंजूर करून आणले. वास्तविक त्यासाठी पुरंदर अथवा खेड शिवापूर हे मध्यवर्ती ठिकाण ठरले असते. प्रत्येक विकासाची बाब बारामतीला आणली जात आहे.
दौंड, इंदापूर, भोर, पुरंदरवर त्यातून अन्याय होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रेल्वेची कनेक्टिव्हीटी असलेल्या दौंडमध्ये झाले असते तर मोठ्या प्रमाणावर तेथील विकास झाला असता. परंतु ते होऊ दिले गेले नाही. बारामतीला बसस्थानकासाठी २२० कोटी मिळतात. पंरतु फुरसुंगी, उरुळी देवाची पाणी योजनेसा येथील नेतृत्वाने २५ कोटी मिळू दिले नाहीत. आता-आता सत्तांतरानंतर तो निधी आम्हाला मिळाल्याचे ते म्हणाले.
शरद पवार यांच्याकडे १८ तास काम करण्याची दूरदृष्टी आहे. पण आत्मकेंद्री राजकारणामुळे ते मागे पडले. आमच्या पक्षावर सातत्याने गद्दारीचा आरोप केला जात आहे. खोके सरकार म्हणून संभावना केली जात आहे. मागील निवडणूक भाजप-सेनेला स्पष्ट कौल दिला असताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय स्वाथार्पोटी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे खरे गद्दार कोण हे जनतेला कळाले आहे,असे शिवतारे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रखडल्या असून सरकार निवडणूकांना भित असल्याच्या टीकेवर ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रवर्गाला आपला अधिकार मिळाला पाहिजे. तो मिळाला की लागलीच निवडणुका होतील, असे देखील शिवतारे यांनी स्पष्ट केले.
...बारामती मतदारसंघाचे नाव बदलून ‘पुणे दक्षिण’ करा
बारामती लोकसभा मतदारसंघात यापूर्वी नेहमीच नुरा कुस्त्या झाल्या. या मतदारसंघातून लोकसभा लढण्यासाठी यापूर्वीच इच्छूक असल्याचे सांगितले आहे. मात्र, हा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील. बारामती हे मतदारसंघाचे नाव बदलून ते पुणे दक्षिण असे करावे, अशी आग्रही मागणी करणार असल्याचे यावेळी शिवतारे म्हणाले.