विजयस्तंभ १ जानेवारीपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 12:00 PM2018-12-07T12:00:48+5:302018-12-07T12:05:27+5:30
गेल्या वर्षी कोरेगाव भीमाला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलीस ठाण्याचा पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरु झाल्या आहेत़.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पेरणे फाटा येथील विजय स्तंभाला १ जानेवारी रोजी अभिवादन करण्यासाठी लाखो भाविक येत असतात़. गेल्या वर्षी कोरेगाव भीमाला झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद पोलीस ठाण्याचा त्याअगोदर पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरु झाल्या आहेत़. १ जानेवारीला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात कोठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तिन्ही पोलीस दल एकत्रितपणे परस्परांशी समन्वय साधून आवश्यक ती पावले उचलत आहेत़.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना १५ आॅगस्ट २०१८ रोजी करण्यात आली़. त्याचबरोबर ग्रामीण पोलीस दलातील लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे़. मात्र, या प्रस्तावाला अजून मंजूरी मिळालेली नाही़. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषद झाली होती़. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल झाली होती़. यात नक्षलवाद्यांचा हात असून एल्गार परिषदेसाठी नक्षलवाद्यांकडून पैसा पुरविण्यात आल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे़.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेरणेफाटा येथे हा विजयस्तंभ येतो़. लोणीकंद व लोणी काळभोर पोलीस ठाणे या अगोदरच्या नियोजनानुसार २६ जानेवारीला पुणे पोलीस दलाकडे हस्तांतरीत करण्याचे शासन पातळीवर निश्चित केले जात होते़. मात्र, १ जानेवारीच्या विजयस्तंभाला होणाऱ्या गर्दीचा विचार करुन ते त्या अगोदर पुणे पोलीस दलाकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु झाल्या आहेत़.
याबाबत पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले की, विजयस्तंभाला दरवर्षी २ ते ४ लाख भाविक अभिवादन करण्यासाठी येतात़. लोणीकंद पोलीस ठाणे पुणे पोलीस दलात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे़ मात्र, शासनाकडून प्रत्यक्ष आदेश येईलपर्यंत त्यावर बोलता येणार नाही़.
गेल्या वर्षी जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता़ तसा कोणताही प्रकार होऊ नये, यासाठी पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस आणि ग्रामीण पोलीस एकत्रितपणे परस्परांशी समन्वय साधून आवश्यक तो बंदोबस्त तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावले उचलत आहेत़. सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे हे दोन्ही पोलीस दलाशी त्याबाबत समन्वय साधत आहेत़.