विजयस्तंभ परिसर केला चकाचक
By admin | Published: January 2, 2015 11:20 PM2015-01-02T23:20:30+5:302015-01-02T23:20:30+5:30
सकाळी ८.३० ची वेळ. हवेत गारठा. अशा वेळी हातात झाडू, बकेट घेऊन महिला, मुले व ७० ते ८० कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात साफसफाईला सुरुवात केली
लोणीकंद : सकाळी ८.३० ची वेळ. हवेत गारठा. अशा वेळी हातात झाडू, बकेट घेऊन महिला, मुले व ७० ते ८० कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात साफसफाईला सुरुवात केली आणि दोन तासांत कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसर चकाचक करून टाकला.
१ जानेवारी २०१५ या दिवशी कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे मानवंदना देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी व शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते येतात. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे कागद, ऊस, हरभरा असा कचरा साठलेला दिसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसा. फाउंडेशन ग्रुपचे अध्यक्ष राजेश दुलीया, सचिव मिलिंद जाधव, संघटक रमेश जाधव व त्यांचे ८० कार्यकर्त्यांनी या परिसराचे चार भाग करून स्वच्छता केली. चार ट्रक कचरा गोळा करण्यात आला. सकाळी ११ पर्यंत संपूर्ण परिसर चकाचक झाला होता.
जनसेवा सहकारी बँक कर्मचारी, युनिटी सोशल फाउंडेशन, भीमशक्ती सामाजिक संघटना पिंपरी, पंचशील संघ तुकारामनगर, हडपसर सोशल ग्रुप, एच. ए. युनियन, ओबीसी संघटना आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, विशाल सोनवणे, सत्यन गायकवाड, राजेश सोनकांबळे, भाऊसाहेब वनवे, दीपक गायकवाड आदींनीही मदत केली. (वार्ताहर)
४गुरूवारी (दि. १ जानेवारी) कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे परिसरात पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे पाकीटे असा केरकचरा मोठ्या प्रमाणातसाठला होता. या परिसरात मोठी जत्राच भरल्याचे दृष्य दिसत होते. हजारो कार्यकर्ते त्यांच्या मुलांबाळासह आले होते. शुक्रवारी हा सर्व परिसर कार्यकर्त्यांनी एकत्र येवून स्वच्छ केला.विजयस्तंभ परिसर हे प्रेरणास्थळ झाले पाहिजे. अशी भूमिका काल सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जाहीर मांडली होती. त्याला अनुसरून ही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.