विकास आमटे, कौशिकी चक्रवर्ती यांना पु.ल. सन्मान जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 01:26 AM2018-11-03T01:26:39+5:302018-11-03T01:27:35+5:30
पुलंच्या नावाने सामाजिक कार्यासाठी अनेक वर्षे दिल्या जाणाऱ्या कृतज्ञता सन्मानाने यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांना गौैरवले जाणार आहे.
पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष ८ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यंदा ग्लोबल पुलोत्सव ‘सबकुछ पु. ल.’ असा असणार आहे. पुलंच्या नावाने सामाजिक कार्यासाठी अनेक वर्षे दिल्या जाणाऱ्या कृतज्ञता सन्मानाने यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे यांना गौैरवले जाणार आहे. पटियाला घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौैशिकी चक्रवर्ती यांना यंदाचा तरुणाई सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आयोजित ग्लोबल या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. सन्मानाची वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, मयूर वैद्य, गजेंद्र पवार, मिलिंद काळे, कृष्णकुमार गोयल, प्रसाद मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदा १७ ते २५ नोव्हेंबरदरम्यान होणारा पुलोत्सव चित्रपट महोत्सव, मान्यवरांचे सन्मान, दृकश्राव्य कार्यक्रम, चर्चा, परिसंवाद, अभिवाचन आविष्कार, संगीत मैफल, नाटक, नृत्य, कविता वाचन, एकपात्री कार्यक्रम, भाषणे, व्यंगचित्र प्रदर्शन, दृश्यफिती अशा अनेकविध कार्यक्रमांनी नटणार आहे. महोत्सव पहिल्यांदाच सबकुछ पु.ल. असणार असून, पुलंवरील तसेच पुलंच्या संबंधातील सुमारे १६ कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. पुलोत्सव बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्व कलादालन, अर्काइव्ह थिएटर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या ठिकाणी पार पडेल. ग्लोबल पुलोत्सवामध्ये यंदा सुमारे ५० कार्यक्रमांची रेलचेल आहे.