आदर्शग्राम निर्मिती अभियानात समितीत विक्रम भोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:32+5:302021-01-18T04:10:32+5:30
नारायणगाव : आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली ...
नारायणगाव : आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये जुन्नर तालुक्यातील कांदळी ग्रामपंचायत डिजिटल करून महराष्ट्रात ‘डिजिटल ग्रामपंचायत’ असा नावलौकिक मिळवणारे सरपंच विक्रम भोर यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे राष्ट्रीय ग्रामीण स्वच्छ भारत अभियान २०२० च्या आराखड्यानुसार ग्रामपंचायत विकास आराखड्यातून आदर्शग्राम निर्मितीसाठी एक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये असणाऱ्या ३४ जिल्हा परिषदमध्ये ३५१ पंचायत समिती आहे. प्रत्येक जिल्हाच्या प्रत्येक तालुक्यात एका आदर्श गावाची (एकूण ३५१ गावे) निर्मिती करण्यात येणार आहे. या आदर्शग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी २० तज्ज्ञ व प्रशिक्षक यांची एक समिती नियुक्त करण्यात आली असून त्यात कांदळी ग्रामपंचायत डिजिटल करून महाराष्ट्रात 'डिजिटल ग्रामपंचायत' असा नावलौकिक मिळवणारे सरपंच विक्रम भोर यांची निवड करण्यात आली आहे. या २० जणांच्या गटात ग्रामविकासातील अध्यक्ष पोपटराव पवार, पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील, बी. एम. वराळे सत्र संचालक एस. डी. बिराजदार समन्वय, आर. टी. दिघडे, भारत अप्पा पाटील, सेवानिवृत्त शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, 'यशदा’चे प्रवीण प्रशिक्षक डॉ. सीमा निकम, जालिंदर काकडे, महेश ढाकणे सरपंच यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण सर्व विभागातून प्रत्येक जिल्हा परिषद मधून २ प्रवीण प्रशिक्षक यांना निमंत्रित केले आहे. त्या प्रवीण प्रशिक्षकांना आदर्श गाव निर्मितीसाठी वरील २० जणांच्या पथकाने मार्गदर्शन व व्याख्यान देणे हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात विक्रम भोर यांना ‘डिजिटल ग्रामपंचायत’ व त्याचे अॅप कसे तयार केले. त्याचा वापर कसा होतो याचे प्रशिक्षण देणे कामी दोन्ही बॅचला प्रत्येकी १ तास या वेळेप्रमाणे निमंत्रित केले आहे, असे पत्र यशदा पुणेचे सत्र संचालक तथा प्रकल्प उपसंचालक बी. एम. वराळे यांनी पाठवून निमंत्रित केले आहे.
फोटो : आदर्श ग्राम निर्मिती प्रक्रियेमध्ये राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी कांदळी गावचे सरपंच विक्रम भोर यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला.