Prithviraj Chavan: विक्रम गोखलेंनी मुख्यमंत्री व्हावे; याचा मलाही आनंद होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 04:08 PM2021-11-14T16:08:44+5:302021-11-14T16:47:49+5:30
गोखलेंनी प्रसामाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे
पुणे : पुण्यात विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला आहे. त्यावेळी प्रसामाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना - भाजपने एकत्र यावे असेही ते यावेळी म्हणाले आहेत. यावरच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोखलेंना उत्तर दिले आहे.
चव्हाण म्हणाले, विक्रम गोखले हे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांना सांगा कि, राजकीय गोष्टींवर काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा. निवडणुकीला उभे राहून लोकांची मत घ्या. तसेच स्वतः मुख्यमंत्री व्हावे, याचा मलाही आनंद वाटेल.
''विचार स्वातंत्र्य असल्यामुळे वाट्टेल ते बरळण्याची काही लोकांना सवय झाली आहे. अशा लोकांना राजाश्रय मिळतो ही दुर्दैवी बाब आहे. अशी विधानं करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा गंध नाही, कुणी कुणी काय काय केलं, किती परिश्रमाने हे स्वातंत्र्य मिळालं हेच त्यांना माहीत नाही. रक्तरंजित क्रांती झाली नाही हेच या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.''
अशी विधाने करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडूनही गौरवले जाते, हे अत्यंत दुर्दैवी
कंगनाच्या वक्तव्याबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले, अशा प्रकारचे वक्तव्य करून ज्या लोकांनी आपले बलिदान दिले, ज्यांनी रक्त सांडले, तुरुंगवास भोगला, लाठ्या खाल्ल्या अशा सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान आहे. व्यक्तिस्वातंत्र्य असल्यामुळे अशी विधाने केली जातात परंतु अशा व्यक्तीला शासनाकडूनही गौरवले जाते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारची विधानं करण्यासाठीची मानसिकता भारतीय जनता पक्षाकडून पसरवली जात आहे.
अशा लोकांना प्रोत्साहन देणाऱ्यांचा शोध घ्यावा
हिंदुत्व हि पॉलिटिकल फॅसिस्ट फिलॉसॉफी आहे..या तत्वज्ञानाबद्दल अशा प्रकारची लोक समोर येऊन समाजात अंतर पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आजपर्यंत कधीही स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमिकेबद्दल अनादर करणारे उद्गार काढले नव्हते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे अशा लोकांना प्रोत्साहन कोण देतो हे शोधायला पाहिजे.