विक्रम वडतिले ठरला मानकरी
By admin | Published: May 4, 2017 02:30 AM2017-05-04T02:30:56+5:302017-05-04T02:30:56+5:30
कुस्त्यांच्या आखाड्यात विक्रम वडतिले यांनी मानाची गदा पटकावली.समस्त ग्रामस्थ मंडळी व श्री बापदेवमहाराज उत्सव समितीच्या
किवळे : येथील ग्रामदैवत श्री बापदेवमहाराजांच्या उत्सवाला रविवारी पहाटेपासून उत्साहात सुरुवात झाली. उत्सवानिमित्त पहिल्या दिवशी अभिषेक, महापूजा पालखी मिरवणूक, छबिना, पुषवृष्टी, हरिजागर आदी धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कुस्त्यांच्या आखाड्यात विक्रम वडतिले यांनी मानाची गदा पटकावली.
समस्त ग्रामस्थ मंडळी व श्री बापदेवमहाराज उत्सव समितीच्या वतीने सकाळी सात वाजता श्रींची महापूजा व अभिषेक तसेच विविध धार्मिक विधी गावचे पोलिस पाटील दिलीप तरस यांच्या हस्ते झाले. सायंकाळी बापदेवमहाराजांच्या पालखीची मिरवणूक ढोल ताशा पथकांच्या गजरात व पारंपरिक वाद्यांवर काढण्यात आली होती. पालखीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मिरवणुकी पुढे उंट व घोडे होते. गावठाणातील विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिजागराचा कार्यक्रम झाला. उत्सवानिमित श्री बापदेवमहाराजांच्या मंदिरासह गावातील विविध देवदेवतांच्या मंदिरांवर रोषणाई करण्यात आली.
दर्शनासाठी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. मनोरंजनासाठी रात्री किरण ढवळपुरीकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा वगनाट्याचा कार्यक्रम झाला. सोमवारी सकाळी तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम झाला. दुपारी बारानंतर श्री बापदेवमहाराजांचा वार्षिक भंडारा उत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थाच्या वतीने भंडाऱ्याचा प्रसादवाटप करण्यात आला. सर्व कार्यक्रमाचे संयोजन बापदेवमहाराज उत्सव समितीच्या पदाधिकारी, सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी केले.
रंगलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात विविध वजन गटानुसार लढती झाल्या. विक्रम वडतिले बापदेव किताबाचा मानकरी ठरला. पुणे, पिंपरी-चिंचवड, हवेली, मावळ व मुळशीतील विविध नामवंत तालमीतील तसेच जिल्ह्याबाहेरील मल्लांनीही हजेरी लावली.
सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बापदेवमहाराज मंदिराजवळ कुस्त्यांच्या आखाड्याला सुरुवात झाली. आखाड्याचे पूजन खासदार श्रीरंग बारणे, कुस्ती परिषदेचे सरचिटणिस बाळासाहेब लांडगे, माजी खासदार नानासाहेब नवले, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. बाळासाहेब तरस व नवनाथ तरस यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामस्थ व उत्सव समितीच्या सर्व सभासदांनी संयोजन केले. (वार्ताहर)
रोख इनाम : गटनिहाय लढतींचे नियोजन
पैलवानांना पाचशे एक रुपयांपासून एक्कावन्न हजार रुपयांपर्यंत रोख इनाम देण्यात आले. शेवटची कुस्ती विक्रम वडितले विरुद्ध नागेश शिंदे यांच्यात झाली. यात वडितले विजयी झाल्याने त्याला दत्तात्रय तरस व शशिभाऊ सहस्रबुद्धे यांच्याकडून रोख ५१ हजार रुपये तसेच गोरख (दादा) तरस व नवनाथ लोखंडे यांच्या वतीने श्री बापदेवमहाराज किताब, चांदीची गदा देण्यात आली. शहर कुस्तीगीर संघटनेचे संतोष माचुत्रे, चंद्रकांत मोहोळ यांनी वजन गटानुसार कुस्त्यांचे नियोजन केले. पंच म्हणून शंकर कंधारे, बाळू काळजे, विजय कुटे, संजय दाभाडे, खंडू वाळुंज यांनी काम पाहिले. निवेदन बाबसाहेब लिमन यांनी केले.