वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 09:46 AM2021-07-24T09:46:15+5:302021-07-24T09:53:01+5:30
Vilas Chafekar : समाजातील वंचित घटकांसाठी, हातगाडी व्यावसायिकांसाठी, कष्टकर्यांसाठी, आदिवासी, महिला, शहरी व ग्रामीण भागातील दीन दुबळ्यांसाठी चाफेकर यांनी आपले जीवन वेचले.
पुणे : जाणीव संघटना, वंचित विकास संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास चाफेकर (वय ८०) यांचे मध्यरात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वेश्या वस्तीतील मुलांसाठी, समाजातील वंचित घटकांसाठी, हातगाडी व्यावसायिकांसाठी, कष्टकर्यांसाठी, आदिवासी, महिला, शहरी व ग्रामीण भागातील दीन दुबळ्यांसाठी चाफेकर यांनी आपले जीवन वेचले.
चाफेकर मूळचे ठाणेकर. मुंबई विद्यापीठात सुवर्णपदकासह एमएची पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. १९७७ ला पीएचडी करुन पुण्यातच स्थिरावले. १९८२ ला जाणीव संघटना आणि १९८५ ला वंचित विकास संस्थेची स्थापना करुन सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवली. वैयक्तिक प्रपंच न मांडता समाजाची, भवतालातील वंचिताची काळजी वाहणे हीच धारणा ठेवत स्वत:ला उत्तममाणूस, कार्यकर्ता आणि शिक्षक म्हणून घडविले. त्यांच्या नि:स्वार्थी कार्यामुळं जनमानसातून त्यांना ‘सर’ ही पदवी बहाल झाली.
वंचित विकास, जाणीव संघटना याबरोबरच नीहार, चंडिकादेवी आदिवासी मुलींचे वसतिगृह, लातूरमधील सबला महिला केंद्र, मानवनिर्माण, गोसावी वस्ती येथील प्रकल्प, जाणीव युवा अशा अनेक संस्थांची निर्मिती त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. त्यांनी रानवारा, संवादिनी आदी प्रकाशने सुरू केली. शालेय जीवनापासून विद्यार्थी संघटना, ग्रामीण शेतमजूर, मुंबईतील वेश्यावस्ती, धारावी झोपड़पट्टी, आणीबाणीचा लढा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ एज्युकेशनच्या प्रकल्पातून त्यांनी काम केले होते.