विलास लांडे यांचे माघारीनाट्य
By admin | Published: November 6, 2016 04:33 AM2016-11-06T04:33:05+5:302016-11-06T04:33:05+5:30
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आल्यानंतर अखेरच्या क्षणी माजी आमदार विलास लांडे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हाधिकारी
पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आल्यानंतर अखेरच्या क्षणी माजी आमदार विलास लांडे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन देखील लांडे यांनी अर्ज मागे घेण्यासाठी प्रतिनिधी पाठविला व स्वत: साडेतीन वाजत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आले. प्रतिनिधीला अधिकृत पत्र न दिल्याने व लांडे वेळेत उपस्थित न झाल्याने त्यांचा माघारीचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. लांडे यांनी ठेवलेला अर्ज तांत्रिक कारणामुळे की राजकीय खेळीमुळे याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत माघारीसाठी अखेरचा अर्धा तास राहिला तरी लांडे अर्ज मागे घेण्यासाठी आले नाहीत.
त्यामुळे राष्ट्रवादीसमोर बंडखोरीचे संकट कायम अशी चर्चा सुरू
झाली.
लांडे यांनी माझा प्रतिनिधी वेळेपूर्वी अर्ज घेऊन आला त्यामुळे माघार घेतली असल्याचे जाहीर करण्याची मागणी केली. विलास लांडे यांच्या माघारी अर्जाबाबत पेच निर्माण झाल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिल भोसले यांनी धावतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. भोसले यांनीदेखील अर्ज घेण्यासाठी प्रचंड आग्रह केला. पक्षाचे नेते अजित पवार यांचा फोन देखील मुठे यांना लावून दिला. परंतु वेळ संपला असल्याचे सांगत मुठे यांनी लांडे यांचा अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
पावणेतीन वाजता लांडे यांचा प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला व उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज भरून दिला. परंतु या प्रतिनिधीकडे लांडे यांनी अधिकृत प्रतिनिधी केल्याचे प्राधिकार पत्र दिले नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र मुठे यांनी स्वीकारला नाही. अर्ज स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर मुठे यांनी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व माध्यम प्रतिनिधींना उमेदवारी अर्ज मागे घेतले. उमेदवार व रिंगणातील उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर विलास लांडे कार्यालयात आले. तोपर्यंत साडेतीन वाजून गेले होते.