गाव तस चांगलं...... विकायला काढलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 07:51 PM2018-05-28T19:51:00+5:302018-05-28T19:51:00+5:30
पुण्यापासून २० किमी अंतरावर असलेल पुरंदर तालुक्यातील बोपगाव हे गाव गावकऱ्यांनी चक्क विकायला काढलंय.
बाळासाहेब काळे
जेजुरी: कर्जबाजारी किंवा परिस्थितीसमोर हार पत्करलेला माणूस जेव्हा हाताशी काही उरत नाही तेव्हा त्याच्या जवळच्या गोष्टी विक्रीला काढतो. परंतु, कधी तुम्हाला एखादे गावच विक्रीला काढल्याची बातमी वाचायला मिळाली तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.पूर्ण गावालाच अतिक्रमणांचा विळखा पडल्याने वैतागलेल्या तरुणांनी गावभर गाव विक्रीला काढल्याची प्रसिध्दीपत्रके चिकटवली. आणि आजूबाजूच्या परिसरात गाव विक्रीला काढल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही घटना आहे पुरंदर तालुक्यातील बोपगावची...
आजपर्यंत सर्व काही वस्तू विकायला काढलेल्या आपण पाहिलं आहे, पण पुरंदर तालुक्यात अस एक गाव आहे. जिथल्या गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढलंय. पुण्यापासून २० किमी अंतरावर असलेल पुरंदर तालुक्यातील बोपगाव हे गाव श्री क्षेत्र कानिफनाथ गड देवस्थान म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. पण हे गाव सध्या ग्रामस्थांनी मोफत विकायला काढलेले आहे. कारण सुद्धा तसेच आहे.
या गावात १९ एकर ग्रामपंचायतीच्या गावठाणाची गायरान जमीन आहे. ग्रामपंचायतीने गायरानात ९ ते १० बेघर कुटुंबांना घरे बांधण्यासाठी पूर्वीच जागा देण्यात आलेली होती. त्याचबरोबर अडीच एकर जमीन ही ग्रामपंचायतीने महावितरणला विद्युत प्रकल्पासाठी दिली आहे. तेथे वीज उपकेंद्र उभारण्यात आलेले आहे. याशिवाय पाच एक्कर जागा श्री कानिफनाथ गड देवस्थानसाठी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी देण्याचे ग्रामपंचायतीचे पूर्वीच नियोजन ही आहे. शिल्लक जागा ही भविष्यातील समाजपयोगी कामासाठी ग्रामपंचायतीने राखीव ठेवली होती. मात्र, गेल्या वर्षभरात राजकीय नेत्यांनी गायरानाच्या पुणे सासवड रस्त्यालगत या रिकाम्या जागेवर आपला मालकी हक्क दाखवून पत्र्याची पक्की शेड उभी करून आपला संसार थाटण्याचा उद्योग उभारला आहे.
सासवड पुणे मार्गालगतच्या याच जागेत कानिफनाथ ट्रस्ट पंचकमिटीच्या नियोजित जागेचा बोर्ड होता. तो ही तोडून त्या ठिकाणी अनेकांनी रातोरात गाळे उभे करून व्यवसाय थाटले आहेत. त्यांना महावितरणकडून अनधिकृत वीज जोडही मिळत आहेत. आज या जागेवर राजरोसपणे अतिक्रमणे सुरू आहे. बोपगाव ग्रामपंचायतीकडून वारंवार सूचना हरकती आल्यावरदेखील ही पंचायतीला न जुमानता अतिक्रमणे वाढतच राहिली आहेत. यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी या मोकळ्या जागेवर सामूहिक आंदोलन केले होते.
गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महसूल विभागाकडे, ग्रामपंचायतीकडे पत्रे देऊन अतिक्रमणे हटवण्याची मागणीही केलेली आहे. ग्रामपंचायतीने ही वारंवार हरकती घेऊन अतिक्रमणे थांबत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सामुहिकरित्या राजीनामे देण्याचे इशारे देऊन ही काहीच फरक पडला नाही. प्रशासनाकडून ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. तोपर्यंत ही तक्रार कमी होण्यातली नाही. गावातील १९ एक्कराचे हे गायरान आहे. कानिफनाथ देवस्थानचे विश्वस्त दीपक फडतरे म्हणाले, हे समाज उपयोगी उपक्रमांसाठी राखीव ठेवणे गरजेचे आहे. मात्र प्रतिष्ठांनी या जागेवर अतिक्रमणे केलेली आहेत.
या संदर्भात गावातील तरुण सहकार्यांसह आम्ही ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमणे हटवण्याची मागणी केलेली असल्याचे सांगितले. या संदर्भात पुरंदर दौंडचे विभागीय अधिकारी संजय आसवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या दोन दिवसात या ठिकाणी तहसिल कार्यालयाचे पथक पाठवून वस्तुस्थितीची माहिती घेत योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे म्हटले आहे.