ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
By admin | Published: February 20, 2017 02:31 AM2017-02-20T02:31:15+5:302017-02-20T02:31:15+5:30
कुठल्याही प्रकारची विकासकामे होत नसल्याने सुलतानपूर (ता. आंबेगाव) येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती
मंचर : कुठल्याही प्रकारची विकासकामे होत नसल्याने सुलतानपूर (ता. आंबेगाव) येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे.
मंचर गावच्या उत्तरेला ३०० लोकसंख्येचे सुलतानपूर गाव आहे. या गावातूनच मंचर शहराला पाणीपुरवठा केला जातो. सुलतानपूर गाव विकासापासून काहीसे वंचित आहे. विशेषत: रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मंचर ते सुलतानपूरहा रस्ता वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत आहे. रस्त्याची खडी वर आली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. गावचा विकास योग्य प्रकारे होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या संदर्भात ग्रामस्थांची बैठक हनुमान
मंदिरात झाली. या बैठकीत निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला. ग्रामस्थांनी आंबेगाव तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
सुलतानपूर गावामध्ये कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नसून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे आम्ही सुलतानपूर ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ५० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.