गावी जाताय...सावधान!
By Admin | Published: October 28, 2016 04:34 AM2016-10-28T04:34:58+5:302016-10-28T04:34:58+5:30
उद्योगनगरीत गेल्या काही महिन्यांपासून खून, लूटमार, वाहनचोरी या घटनांचे प्रमाण वाढले असून, घरफोड्यांचे तर सत्र आहे. रात्रीसह दिवसादेखील घरफोड्या होत आहेत.
- सचिन देव, पिंपरी
उद्योगनगरीत गेल्या काही महिन्यांपासून खून, लूटमार, वाहनचोरी या घटनांचे प्रमाण वाढले असून, घरफोड्यांचे तर सत्र आहे. रात्रीसह दिवसादेखील घरफोड्या होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना ऐन सणासुदीत घराबाहेर पडताना व बाहेरगावी जाताना सावध रहावे लागणार आहे.
गेल्या आठवड्यात भोसरी आणि मोशी येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या. यामध्ये एका दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम व इतर मुद्देमाल मिळून सुमारे ४५ हजारांचा माल लंपास केला. विशेष म्हणजे हे दुकान वर्दळीच्या परिसरात असतानादेखील चोरीची घटना घडल्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच मोशी येथे एका कंपनीचे शोरूमचे दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील टीव्ही, होम थिएटर व इतर मुद्देमाल लंपास केला.
पिंपरीमध्येच एका हॉटेलात जेवणासाठी दुचाकी हॉटेलसमोरच पार्किंग केली. दुचाकीच्या डिक्कित ठेवलेल्या सव्वातीन लाख रुपयांच्या रोकडसह चोरट्याने दुचाकी लंपास केली. या घटनेमुळे सुरक्षित
ठिकाणी केलेली वाहनांची पार्किंगदेखील सुरक्षित नसल्याचे दिसून आले.
... अशी घ्या घराची काळजी
- गावी जाताना विश्वासू शेजारच्या नागरिकांना घरावर लक्ष ठेवण्यासंबंधी माहिती द्यावी.
- संबंधित पोलीस ठाण्यातदेखील अर्ज द्यावा.
- घरातील मौल्यवान वस्तू व कागदपत्रे शक्य असल्यास घरात सुरक्षित ठिकाणी ठेवावी.
- सोसायटी असेल तर तेथील रहिवाशांना शक्य असल्यास सुरक्षारक्षक ठेवावा. सुरक्षारक्षकाची संपूर्ण माहिती स्वत:जवळ ठेवावी आणि पोलीस ठाण्यातदेखील द्यावी.
- सोसायटीतील रहिवाशांनी शक्य असल्यास सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी.
- वाकड येथे दोन दिवसांपूर्वीच चोरट्यांनी दिवसाढवळया एका बंद घराचे कुलूप उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजारच्या नागरिकांना हा प्रकार लक्षात येत्ताच त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी पळ काढला. अशाच प्रकारे येथील प्रभात कॉलनीजवळ एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली मोटारगाडी चोरटे पहाटे सहाच्या सुमारास चोरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, सोसायटीचा दरवाजा उघडत असताना, आवाज आल्याने चोरट्यांनी पळ काढला. सोसायटीतील रहिवाशांनी चोरट्यांचा शोध घेतला. मात्र, चोरटे हाती लागले नाहीत.
पोलिसांची रात्रीच्या वेळी शहरातील प्रत्येक ठिकाणी गस्त असते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त अधिक वाढविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बाहेरगावी जाताना शेजारील विश्वासू नागरिकांना आणि पोलिसांना माहिती देऊन जावे. त्यामुळे पोलिसांचेदेखील ती सोसायटी, घर यांच्यावर विशेष लक्ष राहील. तसेच शक्य असल्यास सुरक्षिततेसाठी महत्वाची कागदपत्रे आणि मोल्यवान वस्तू घरात न ठेवता विश्वासू व्यक्ती किंवा बँकेत ठेवावेत.- राम मांडुरके, सहायक पोलीस आयुक्त