अभ्यासाचा उपक्रम राबविणारे गाव : म्हाळवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:38+5:302021-05-16T04:11:38+5:30
पुणे जिल्ह्यातील अभ्यासाचे एकमेव गाव म्हाळवडी-गावांना प्रेरणा देणारा उपक्रम. महूडे वार्ताहर राज्यात संविधान गाव, पुस्तकांचे गाव, आदर्श गाव, ...
पुणे जिल्ह्यातील अभ्यासाचे एकमेव गाव म्हाळवडी-गावांना प्रेरणा देणारा उपक्रम.
महूडे वार्ताहर
राज्यात संविधान गाव, पुस्तकांचे गाव, आदर्श गाव, अशी गावे आपण पाहिली आहेत. परंतु कोरोना काळातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हसत खेळत शिक्षण या संकल्पनेतून म्हाळवडी (ता. भोर)हे संपूर्ण गाव अभ्यासाचे गाव म्हणून पुणे जिल्ह्यात एकमेव असल्याने म्हाळवडी गावचा हा शैक्षणिक आगळा वेगळा उपक्रम गावोगावांना प्रेरणा देणारा आहे.
भोर पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेले म्हाळवडी (ता.भोर) हे जवळपास २३०० लोकवस्तीचे गाव आहे. येथे पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. परंतु कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत तर मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना गावातच हसत-खेळत शिक्षण मिळाले पाहिजे. ही संकल्पना येथील प्राथमिक शिक्षक रामदास पाटील राजेंद्र थोरवत, गणेश बोरसे, यांनी गावकरी युवक यांच्यासमोर मांडली त्यास राजेश बोडके या स्थानिक युवकाने सहमती दर्शवून या कामासाठी येणारा खर्च देण्याचे मान्य केले व प्रत्यक्षात गावात कामाला सुरुवात झाली.
कोरोनामुळे शाळेतील मुले, मुली घरीच आहेत. त्यांना हसत-खेळत शिक्षण मिळावे, यासाठी म्हाळवडी संपूर्ण गावातील घरांच्या भिंतीवर तसेच जिथे जागा आहे, विद्यार्थ्यांचे लक्ष जाईल त्या ठिकाणी ऍप्यक्स (पेंट) कलरमध्ये शिवाजी महाराजांची वंशावळ, संविधान, किल्ल्यांची माहिती, बाराखडी, इंग्रजी शब्द, राज्य व त्यांच्या राजधानी, स्वच्छतेचे संदेश, मराठी मुळाक्षरे, नागरिकांचे अधिकार, अंक गणिते, ३० पर्यंत पाढे असे गावच्या भिंतीवर जवळपास ८० ते ८५ फलक लिहिले असल्याचे (चित्रकार) पेंटर संदीप बोडके व सागर बोडके यांनी सांगितले. हे फलक तयार करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागला. या कामी राजेश बोडके तसेच सायबेज सॉफ्टवेअर कंपनीचे रितू नथानी (संचालिका) यांचे योगदान मोलाचे ठरले.
यावेळी अभ्यासाचे गाव म्हाळवडी या फलकाचे उद्घाटन केले यावेळी माजी उपसभापती मंगल बोडके, केंद्रप्रमुख धनाजी नाझीरकर, सरपंच दत्तात्रय बोडके ,अमोल बोडके, साहेबराव बोडके, संजया बोडके, नथू बोडके, गणपत गायकवाड, भोरचे सामाजिक कार्यकर्ते समीर घोडेकर, मनोज धुमाळ यावेळी उपस्थित होते या सर्वांनी अभ्यासाचे गाव या संकल्पनेचे कौतुक केले.
--
फोटो क्रमांक - १५ महुडे अभ्यासाचे गाव
फोटो - उपक्रमाचे उद्घाटन करताना ग्रामपंचायती पदाधिकारी व ग्रामस्थ