प्राधान्यक्रमानुसार गावची विकासकामे करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:18+5:302021-06-27T04:08:18+5:30
जेजुरी: गावचा सर्वांगीण विकास करत असताना नागरिकांच्या गरजा ओळखून त्या विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा व त्यानुसार नियोजनबद्ध विकास करावा. ...
जेजुरी: गावचा सर्वांगीण विकास करत असताना नागरिकांच्या गरजा ओळखून त्या विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा व त्यानुसार नियोजनबद्ध विकास करावा. रस्ता, शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, दशक्रियाविधी घाट, दिवे, पाणंद रस्ते, गटार योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना व अन्य विकासकामे यामध्ये प्राधान्यक्रमाने जी जी कामे सुचवताल त्यासाठी विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहू, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे यांनी दिले आहे.
शिवरी (ता. पुरंदर) येथे बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटातील प्रभाग समितीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव, विस्तार अधिकारी एम. एम. कांबळे, पी. एस मेमाणे, रेखा खटावकर, एस. जी. पवार, सागर डांगे, आकाश कुंजीर, गोपाल शर्मा, उद्धव वीर, अनिल जगदाळे, सतीश कुदळे, प्रमोद जगाताप, ताई गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन, कोरोना लसीकरण, शाळा इमारती, शोषखड्डे, रस्ते, अंगणवाडी, आरोग्य सुविधा याबाबत सविस्तर आढावा सरपंच व ग्रामसेवकांनी सादर करीत अनेक विकास कामांची मागणी केली.
पी. एस. मेमाने यांनी गावची कोरोनाची परिस्थिती पाहून छोट्या छोट्या शाळा सुरू करण्याचा विचार असून त्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. कृषी अधिकारी एस. जी. पवार यांनी नैसर्गिक सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रकल्प,बायोगॅस,विधवा माता योजना, सोलर वॉटर हीटर यांसारख्या योजना सांगत गतवर्षी शंभर टक्के निधी खर्च केल्याचे सांगितले, तर आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव यांनी तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यापेक्षा कमी होण्यासाठी गावोगावी ॲन्टिजन, आरटीपीसीआर टेस्ट शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
खळद येथे विकासकामांसाठी निधी येऊन दोन वर्षे होऊनही ग्रामसेवकांच्या उदासीन भूमिकेमुळे कामे रेंगाळतात, लसीकरण केंद्रावरती नियोजनाचा अभाव, अपुरे कर्मचारी,पाण्याची सोय नाही, सॅनिटायजर, ऑक्सिमीटर,तापमापक अशा कोणत्याही सुविधा नसल्याचे योगेश कामथे यांनी सांगितले, तर शिवरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे पुनर्वसन करण्याची मागणी अंकुश कामथे, कैलास कामथे यांनी केली.
२६ जेजुरी
प्रभाग समितीच्या बैठकीत बोलताना दत्ता झुरंगे.