पंचायत राज व्यवस्थेतून गावाचा विकास करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:19+5:302021-06-28T04:08:19+5:30

रांजणगाव गणपती: येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत इमारतीतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय व थोर नेते ...

The village should be developed through Panchayat Raj system | पंचायत राज व्यवस्थेतून गावाचा विकास करावा

पंचायत राज व्यवस्थेतून गावाचा विकास करावा

Next

रांजणगाव गणपती: येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत इमारतीतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय व थोर नेते यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असलेल्या पंचायत राज व्यवस्थेतून गावचा नियोजनबद्ध विकास करावा, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील सुमारे १ कोटी ४५ लाख रुपये खर्चाच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी वळसे पाटील बोलत होते. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार ॲड. अशोक पवार, संग्राम जगताप, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर पं. स. समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, उपसभापती सविता पऱ्हाड, माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर, माजी सरपंच भिमाजी खेडकर, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जि. प. सदस्या स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, कुसुम मांढरे, माजी सदस्या कविता खेडकर, प्रकाश पवार, केशरताई पवार, देवदत्त निकम, ॲड. प्रदीप वळसे पाटील उपस्थित होते.

वळसे पाटील पुढे म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून महाआघाडी सरकार कोरोना महामारीला तोंड देत आहे. दुसऱ्या लाटेत आपण आपल्या जिवाभावाची माणसं गमावली, आता त्यातून बाहेर पडतोय तर आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड द्यायला सज्ज व्हावे लागणार आहे. रांजणगाव गणपती देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ एकत्र येऊन अद्ययावत सोयी-सुविधांयुक्त ३०० बेडसचे सुसज्ज हॉस्पिटल उभारले तर गोरगरिबांना मदत होईल. ग्रामीण भागात चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे गरजेचे असल्याचेही वळसे पाटील यांनी या वेळी सांगितले.

खासदार कोल्हे म्हणाले की, पुणे-नगर हायवेवर वारंवार होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाघोली ते शिरूर अंतरादरम्यान १८ लेन फ्लायओव्हरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित असून त्यासाठी साडेआठ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यावेळी पाचुंदकर, गावडे, आमदार पवार, जगताप, आढळराव पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. माणिक खेडकर यांनी केले. स्वागत सरपंच सर्जेराव खेडकर यांनी केले, तर आभार विक्रम पाचुंदकर यांनी मानले.

२७ रांजणगाव गणपती

रांजणगाव गणपती येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे भूमिपूजनप्रसंगी वळसे पाटील व मान्यवर.

Web Title: The village should be developed through Panchayat Raj system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.