गाव ते गाव, जुनं घरच चांगलं होतं
By admin | Published: July 30, 2016 05:00 AM2016-07-30T05:00:08+5:302016-07-30T05:00:08+5:30
‘आमचं गाव लय मोठं होतं, खूप छान होतं, जुन्या गावात राहायची सवय लागली. त्यामुळे नवीन घरात राहायला आवडणार नाही. तिथं आरसीसी घरं बांधली आहेत; मात्र आमचं
घोडेगाव : ‘आमचं गाव लय मोठं होतं, खूप छान होतं, जुन्या गावात राहायची सवय लागली. त्यामुळे नवीन घरात राहायला आवडणार नाही. तिथं आरसीसी घरं बांधली आहेत; मात्र आमचं मातीचं घर ते मातीचच,’ अशी खदखद व्यक्त करीत माळीणमधील महिलांनी आठवणींना उजाळा दिला.
शेतीच्या कामासाठी दुर्घटनाग्रस्त माळीण गावातून पायी जात असलेल्या महिलांनी अनेक आवठणी सांगितल्या. गाव ते गाव. अजूनही सगळा गाव आठवतोय. गाव लंय मोठा होता. या जुन्या गावात वरपर्यंत घरं होती. आमची घर खूप छान होतं. सगळी मुलं पटांगणावर खेळायला यायची. गावातले लोक, सगळी तरुण पोरं मंदिराच्या पुढं जमायची, गप्पा मारायची. गावात प्रत्येक सणाला मजा यायची. बैलपोळा जोरात साजरा व्हायचा. गल्लीतून बैलांची मिरवणूक निघत होती. बाहेरगावची पाहुणेमंडळी आमच्या पोळ्याला यायंची. पण, सारा गाव गेला. जेव्हा डोंगर खाली आला तेव्हा मारुतीचं मंदिर पहिलं उडून गेलं. मारुतीच्या मूर्तीचा लोकांनी खूप शोध घेतला; पण अजूनही सापडली नाही. नवीन घरं दिवाळीपर्यंत देऊ, असं सांगत आहेत. सध्या पावसामुळे काम बंद आहे व बारा घरं पूर्ण झाली आहेत; पण नवीन घरात राहायला फार आवडणार नाही. जुन्या गावात राहायची सवयं झाली. अचानक कुठं गेल्यावर अवघडल्यासारखं होतं तसंच नवीन गावात गेल्यावर होईल. शेडमध्येपण राहायला आवडत नाही; पण नाइलाजानं राहावं लागत आहे. शेवटी कितीपण आरसीसी घरं बांधली, तरी आमचं मातीचं घर ते मातीचं घर! (वार्ताहर)
नवीन गावाचं काम जाऊन पाहिलं; पण आम्हाला नाही आवडलं. छोटी-छोटी घरं आहेत ती. पुरायची कशी? घरात सरपण कुठं ठेवणार? गौऱ्या कुठं रचणार? बैलांची वैरण कुठं ठेवणार?
सार्वजनिक गुरांचा गोठा केलाय. त्यात गावातील सगळी जनावरं एकत्र ठेवायची. हे कसं शक्य होईल? बाया गोठ्यात झाडायला लागल्या, तर याचं शेण त्याच्या अंगावर उडलं, तर बायकांची भांडण होणार, अशा अडचणी महिलांनी सांगितल्या.