शहरातून येणाऱ्यासोबत गावकऱ्यांनो असे वागणे बरे नव्हे...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 06:20 PM2020-03-29T18:20:27+5:302020-03-29T18:22:14+5:30
शहरांमधून आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना गावकरी गावबंदी करत असल्याने त्यांना त्रासाला सामाेरे जावे लागत आहे.
पुणे : ज्या गावात जन्म झाला. लहानाचे मोठे झालो. शाळेत आणि महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेता आले. कामाच्या निमित्ताने शहरात गेल्यानंतरही गावासोबत नाळ जुळून राहिली. असे असताना देखील अनेक परगावच्या विद्यार्थी, कामगार, उद्योग व्यापार करणारे, नोकरी करणारे यांना गावकऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बाहेरगावावरून आलेल्या प्रत्येकाला कोरोना आहे असे समजून त्याला चक्क गावात न घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकारामुळे संबंधित व्यक्तीने गावाच्या विरोधातच दावे दाखल केले जातील. अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून तो रोखण्यासाठी सर्व स्तरावरून विशेष प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या परिस्थितीत बाहेर गावावरून शिक्षण घेण्यासाठी शहरात आलेले विद्यार्थी यांच्या जेवणाचे हाल होत असताना दिसून आले. यावेळी शहरातील विविध सेवाभावी संघटना यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या जेवणाची समस्या दूर केली. अनेक जणांनी घरचा रस्ता धरला. यात कामगार, व्यावसायिक, तसेच महिला वर्गाचाही समावेश आहे. मात्र या व्यक्ती आपआपल्या गावी पोहचताच त्यांना वेगळ्या अनुभवाला सामोरे जावे लागले. गावकऱ्यांनी त्यांना गावात येऊ देण्यास मनाई केली. आता पोलीस प्रशासन यांनी जिल्हाबंदीचे आदेश दिले असताना गावकऱ्यांनी तो आदेश पुढे करत आपल्याच गावातील विद्यार्थी, कामगार यांना गावात येऊ दिले नाही. यामुळे शहरातून गावी गेलेल्या विद्याथी, कामगार, व्यावसायिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच वेळ पडल्यास संबंध गावाच्या विरोधात दावे दाखल करण्याची तयारी दर्शवली.
या साऱ्या प्रकाराविषयी कायद्याच्या दृष्टिकोनातुन माहिती देताना ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड म्हणाले, गावात कुणाचे लग्न निघाले तर त्या पत्रिकेत किती जणांची नावे असतात. त्यावेळी कामानिमित्त किती व्यक्ती बाहेर आहेत याची माहिती मिळते. कर्फ्यू अंमलात आणल्यावर रस्त्यावर फिरकणे बंद झाले. बाजारपेठ बंद झाली. खानावळीना कुलूप लागले. अशावेळी अनेकांना आपले गाव आठवणे साहजिकच आहे. घरच्या माणसांना देखील शहरात असणाऱ्या माणसाबद्दल आस्था, काळजी होती. अनेक कुटुंबांनी त्या व्यक्तींना सामावून देखील घेतले. मात्र अद्याप काही ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. गावातील पंचायतीने आणि गाव पुढाऱ्यांनी ज्याचे गावात घर आहे त्यांना गावबंदी केली.
मागील पाच ते सहा वर्षापासुन शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी सांगितले, गावातील व्यक्तींची मानसिकता अतिशय टोकाची आहे. त्यांनी रस्ते अडवले आहेत. घरच्या माणसांना गावाच्या पुढे जाऊन चालणार नाही. ते आम्हला अद्याप शहरात राहण्याचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे आपल्याला कुठलाही आजार नाही याचे कागदोपत्री पुरावे दिल्यानंतर देखील गावकरी ऐकत नाहीत. याला काय म्हणावे? किमान 10 ते 15 हजार लोकसंख्या असलेल्या गावाकडची अशी परिस्थिती असेल तर दुर्गम भागातील खेड्यामध्ये काय चित्र असेल ? असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
या गोष्टीचा विचार करणार आहोत की नाही...
१. कोरोनाची लागण होऊन तीन आठवडे संपले आहेत. या तीन आठवड्यात गावातील नेतेमंडळी इतर नेतेमंडळीना भेटायला जात होती. इतर गावातील पुढारी गावात येत होते. अशावेळी अनेक तरुण या नेत्यांसमवेत गर्दी करत होते. त्यांना लागण झाली असल्यास काय?
२. त्या गर्दीत सहभागी झालेले काही तरुण बाहेरगावाहून आले असतील तर त्यांना येऊ दिले की नाही ? काळजी जरूर घ्यावी. गावातील सरपंच, नेतेमंडळी यांची जबाबदारी असेल ती म्हणजे गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मात्र त्यासाठी गावबंदी करण्याची गरज आहे का ?
३. बाहेरगाव किंवा शहरातून आलेल्या व्यक्तीना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था गावाला सुलभ होते. शहरात तुलनेने ते अवघड आहे. गावात स्वतंत्र विलनिकरण कक्ष उभारता येणे शक्य आहे. शेतावर ठिकाणी याप्रकारे व्यवस्था करता येईल. काही गावात असे होत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.