अबोली भोसलेंना उपसभापती करण्याची ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:10 AM2021-04-04T04:10:50+5:302021-04-04T04:10:50+5:30
सांगवी: बारामती पंचायत समितीचा केवळ १ वर्षांचा कालावधी शिल्लक राहिल्याने येत्या ९ एप्रिलला शेवटचे उपसभापतिपद नक्की कोणाला मिळणार, ...
सांगवी: बारामती पंचायत समितीचा केवळ १ वर्षांचा कालावधी शिल्लक राहिल्याने येत्या ९ एप्रिलला शेवटचे उपसभापतिपद नक्की कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून आहे. अबोली भोसले या सुशिक्षित असून त्यांनी आतापर्यंत महिलांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना, विविध उपक्रम राबविले आहेत. यामुळे अनुसूचित जातीमधून बारामती पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी अबोली भोसले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संधी द्यावी यासाठी सांगवी गणामधील नागरिक आता मागणी करू लागले आहेत.
या पंचवार्षिक कार्यकाळात सांगवी - डोर्लेवाडी, गुणवडी- पारवडी या दोन्ही गटाला सभापती व उपसभापतिपदासाठी संधी मिळाली गेली नाही. यामुळे अनुसूचित जातीमधून महिलांना सभापती व उपसभापती पदासाठी अद्याप संधी उपलब्ध झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सावट उमटताना दिसत आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जातीला सभापतिपदाचे आरक्षण जाहीर झाले होते. निवडणूकी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुसूचित जाती मधून माळेगावचे संजय भोसले व निरावागजच्या अबोली भोसले यांना सव्वा-सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी सभापतिपद देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी अनुसूचित जातीमधून माळेगाव- पणदरे गणामधून संजय भोसले यांना पहिल्या सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी सभापतिपदासाठी संधी देण्यात आली होती. त्यानंतर ठरल्याप्रमाणे नीरावागज गावच्या अबोली भोसले यांना देखील सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी पंचायत समितीचे सभापती पद देण्यात येणार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी अबोली भोसले यांना उपसभापती पदावर विराजमान होण्यासाठी संधी नक्कीच देतील अशी आशा कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, नीरावागज मधील नागरिक करू लागले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुसूचित जाती मधून अबोली भोसले यांना उपसभापतिपदासाठी संधी उपलब्ध करून देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
-------------------------