आरोग्य वर्धिनीची पदे न भरल्याने सेवेपासून ग्रामस्थ वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:03+5:302021-05-18T04:10:03+5:30

माळेगाव व परिसरातील ग्रामस्थांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत विक्रमसिंह राजेजाधवराव यांच्या प्रयत्नातून ...

Villagers deprived of services due to non-filling of health promotion posts | आरोग्य वर्धिनीची पदे न भरल्याने सेवेपासून ग्रामस्थ वंचित

आरोग्य वर्धिनीची पदे न भरल्याने सेवेपासून ग्रामस्थ वंचित

Next

माळेगाव व परिसरातील ग्रामस्थांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत विक्रमसिंह राजेजाधवराव यांच्या प्रयत्नातून सुसज्ज असे आरोग्य केंद्र मंजूर झाले. तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी सदरच्या आरोग्य केंद्राचे भूमिपूजन केले. तर इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर 31 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन झाले असले, तरी शासनाकडून या केंद्रात पदाची निर्मिती व पदभरती करण्यात आली नाही. परिणामी, या केंद्रात केवळ सध्या कोविड लसीकरण चालू असून इतर आरोग्य सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना पणदरे, ता. बारामती येथे जावे लागते.

या केंद्रात वैद्यकीय अधिकारी,मेडिकल ऑफिसर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, क्लार्क, शिपाई, ॲम्ब्युलन्स चालक आदी पदाची गरज आहे. या पदाची प्रथम निर्मिती आवश्यक आहे. पदनिर्मिती लवकर होणे अपेक्षित असून पदभरती केली तरच आरोग्य वर्धिनी केंद्रात आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.

दरम्यान, या आरोग्य वर्धिनी केंद्राचा लाभ माळेगाव, माळेगाव खुर्द, शिवनगर, पाहुणेवाडी, येळेवस्ती, धुमाळवाडी येथील ग्रामस्थांना होणार असून, कमी खर्चात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहेत. यामुळे या केंद्रात पदाची भरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या केंद्रात शासनाकडून लवकरच पदभरती होणार असून, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. पदभरती झाल्यावर लवकरच या केंद्रात आरोग्य सुविधा मिळतील.

-संजय भोसले- माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य

सध्याच्या कोविड काळात या केंद्रात लवकर स्टाफ भरती करून ग्रामस्थांच्या सेवेत दाखल झाले पाहिजे. हे केंद्र लवकर सुरू झाल्यास त्याचा फायदा गोरगरिबांना होईल.

- जयदीप विलास तावरे- माजी सरपंच

माळेगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्र

Web Title: Villagers deprived of services due to non-filling of health promotion posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.