ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे

By admin | Published: July 9, 2015 02:01 AM2015-07-09T02:01:44+5:302015-07-09T02:01:44+5:30

फलोदे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून फलोदे येथील ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले.

The villagers locked the school | ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे

ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे

Next

तळेघर : फलोदे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून फलोदे येथील ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील फलोदे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेवर दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांपैकी एक ६ महिन्यांच्या रजेवर आहेत. तर, यशवंत शेळकंदे हे शिक्षक कार्यरत आहेत. हे शिक्षक मनमानी कारभार करून शाळेत मद्यप्राशन करुन येतात. ही बाब वारंवार फलोदे ग्रामस्थांनी त्या वेळचे गटशिक्षणाधिकारी व आताचे गटविकास अधिकारी संजय नाईकडे यांच्या लक्षात आणून दिली होती. पंचायत समितीमध्ये जाऊन ग्रामस्थांनी शिक्षकाच्या बदलीचे अर्जही दिले होते; परंतु अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे फलोदेचे सरपंच अशोक पेकारी यांनी ‘लोकमत’शी बोलातना सांगितले.
यशवंत शेळकंदे शाळेत उशिरा व मद्यप्राशन करून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिला आहे. पालकांनी मुले इतर शाळेत शिक्षणासाठी पाठविली आहेत. फलोदे ग्रामस्थांनी दि. ६ जुलै रोजी पंचायत समितीसमोर आंदोलन केले. यावेळी अशोक पेकारी, मंदा मेमाणे, शिवराम ठोकळे, ज्ञानेश्वर मेमाणे, किसन तिटकारे, एकनाथ मेमाणे, मोहन शिंगाडे, मनोहर मेमाणे, संदीप उतळे, नितीन ठोकळ, अजित केंगले, तुषार उतळे उपस्थित होते.

गटविकास अधिकारी संजय नाईकडे यांनी ग्रामस्थांना सांगितले, की दोन दिवसांमध्ये गटशिक्षणाधिकारी पाठवून शाळेवर दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी फलोदे येथील ग्रामस्थांनी दूरध्वनी करून नाईकडे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘तुम्हाला जे करायचे ते करा,’ अशा उलट भाषेत नाईकडे यांनी उत्तर दिल्यावर ग्रामस्थांनी तातडीने शाळेला टाळे ठोकले. काही महिन्यांपूर्वी फलोदे ग्रामस्थांनी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे तक्रार केली होती; परंतु या अधिकाऱ्यांनी एक महिन्यापूर्वी निलंबनाची कारवाई करून त्या शिक्षकाला पुन्हा त्याच जागेवर बसविले. दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: The villagers locked the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.