कौठडी भोळोबावाडी येथील स्टोन क्रशरला ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:15 AM2021-08-12T04:15:24+5:302021-08-12T04:15:24+5:30

कुरकुंभ : कौठडी मौजे भोळोबावाडी (ता. दौंड) येथील गट न. १८१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्टोन क्रशरचे काम ग्रामस्थांनी ...

Villagers oppose stone crusher at Kauthadi Bholobawadi | कौठडी भोळोबावाडी येथील स्टोन क्रशरला ग्रामस्थांचा विरोध

कौठडी भोळोबावाडी येथील स्टोन क्रशरला ग्रामस्थांचा विरोध

googlenewsNext

कुरकुंभ : कौठडी मौजे भोळोबावाडी (ता. दौंड) येथील गट न. १८१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्टोन क्रशरचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. तत्कालीन ग्रामसेवक शशिकांत जाधव यांनी सरपंच प्रीती नितीन मेरगळ यांच्या सह्या असणारे लेटर हेड आर्थिक हितसंबंधातून परस्पर वापरून परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावाच्या परिसरात असणाऱ्या फळबागा, पोल्ट्री व्यवसाय, शेतीसह ग्रामस्थांना आरोग्याच्या अत्यंत गंभीर दुष्परिणामांना यामुळे सामोरे जावे लागणार असल्याचे मत ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत मांडले. तसेच ग्रामसेवक शशिकांत जाधव यांनी सरपंच प्रीती नितीन मेरगळ यांच्या सह्यांचा केलेल्या गैरवापराबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याची मादणी केली आहे.

कौठडी, मौजे भोळोबावाडी येथील गट. न. १८१ मध्ये गुरुदत्त स्टोन क्रशर नावाने (दि. ४) एप्रिलचा ठराव क्रमांक ६/१ नुसार (दि. १०) मे रोजी ना हरकत दाखल देण्यात आला होता. मात्र, विशेष बाब व अत्यंत महत्वाच्या व आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी असणाऱ्या सरपंचाच्या सह्या असलेल्या लेटर हेडचा गैरवापर करून सदर दाखला कुठल्याही प्रकारची ग्रामसभा न घेता तसेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांना कसलीही माहिती न देता परस्पर देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

दरम्यान, ग्रामस्थांच्या झालेल्या या फसवणुकीविरोधात तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पांडुरंग मेरगळ यांनी या विरोधात जनआंदोलन उभारून कायदेशीर लढाई उभारण्याचा इशारा दिला आहे. याबाबत विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी या स्टोन क्रशर विरोधात एकमताने विरोध करीत ग्रामसेवक शशिकांत जाधव यांच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. या वेळी सरपंच प्रीती मेरगळ, उपसरपंच शिवाजी मेरगळ, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी काम बंद पाडल्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली असून कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यस्था बिघडू न देण्याच्या सूचना पोलीसांनी दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी कायदेशीर लढा उभारण्याचा संकल्प केला आहे. मात्र, याबाबत अधिक माहितीसाठी तत्कालीन ग्रामसेवक शशिकांत जाधव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात या भ्रष्ट कारभाराची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.

--

कोट -१

स्टोन क्रशरला दिलेला ठराव हा माझ्या संमतीशिवाय दिलेला असून ग्रामसेवकांनी याबाबत आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तयार केलेला आहे. यामध्ये आमच्यासह सर्व ग्रामस्थांची फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा नव्याने याबाबत ठराव करून पूर्वीचा ठराव रद्द केला आहे. याविरोधात कायदेशीर प्रक्रियाद्वारे जन आंदोलनाद्वारे लढाई लढणार आहोत

- प्रीती नितीन मेरगळ, सरपंच, कौठडी

--

चौकट

ग्रामपंचायत कारभाराचे वाभाडे

ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये मासिक बैठका, ग्रामसभा यामध्ये होणाऱ्या ठरावामध्ये जाणीवपूर्वक काही जागा सोडली जाते. त्यामुळे बऱ्याच गोष्टी ग्रामस्थांच्या उपस्थितीत लिहिल्या जात नाही. महिला सरपंच अथवा कमी शिकलेल्या व्यक्ती सरपंचपदी विराजमान असताना ठरावामध्ये बदल करणे, वेगळ्या प्रकारचे ठराव करणे, सरपंचाच्या सह्यांचे लेटर हेड परस्पर वापरणे यांसारखे गंभीर प्रकार सर्रासपणे होत असल्याचे या प्रकारातून आढळून येत आहे.

--

फोटो क्रमांक : १० कुरकुंभ कौठाळी खडी क्रेशर

कौठाळी येथील विशेष ग्रामसभेमध्ये खडी क्रेशरला विरोध करताना ग्रामस्थ.

100821\10pun_1_10082021_6.jpg

फोटो क्रमांक : १०कुरकुंभ कौठाळी खडी क्रेशरकौठाळी येथील विशेष ग्रामसभेमध्ये खडी क्रेशरला विरोध करताना ग्रामस्थ

Web Title: Villagers oppose stone crusher at Kauthadi Bholobawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.