पैसे देऊनही गावांना पाणी मिळेना

By admin | Published: April 10, 2017 02:16 AM2017-04-10T02:16:03+5:302017-04-10T02:16:03+5:30

जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे देऊनही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पैसै देऊनही पाणी मिळत नाही

The villages also get water without paying money | पैसे देऊनही गावांना पाणी मिळेना

पैसे देऊनही गावांना पाणी मिळेना

Next

पुणे : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे देऊनही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पैसै देऊनही पाणी मिळत नाही. नळ कनेक्शनसाठी जादा पैसै घेतले जातात. अपुरा व अनियमित पाणीपुरवठा केला जातो. करारानुसार गावांना पाणी दिले जात नाही. त्यामुळे प्राधिकरण विभाग नागरिकांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी पाणी टंचाईच्या आढावा बैठकीत केला.
या वेळी भाजपाचे गटनेते शरद बुट्टे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गावाला जेवढे पाणी मंजूर करते तेवढे पाणी देत नाही. मात्र, पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वसूल केली जाते. पाणीटंचाईच्या काळामध्ये गावांचे पाणी तोडू नये, गावांना अतिरिक्त दंड आकारू नये. (प्रतिनिधी)


प्राधिकरण करतेय नागरिकांची लूट
धरण उशाशी असूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. शिवणे-कोंढवे गटामधील काही गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी दिले आहे. गावाकडून नियमितपणे पाणीपट्टी घेतली जाते. मात्र, पाणीपुरवठा केला जात नाही. नागरिकांना अपुरे व अनियमित पाणी मिळते. नवीन पाणी कनेक्शनसाठी लाखो रुपयांची मागणी केली जाते. प्राधिकरण विभागाचे पाण्याचे दर महापालिकेच्या दरापेक्षा जास्त असल्याचे जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी सांगितले.

पाणीपट्टी भरली नाही या कारणामुळे नागरिकांचे पाणी तोडू नये. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांची गैरसोय करू नये. शिवसेनेचे सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली भागामध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे.
-आशा बुचके, गटनेत्या, शिवसेना

जिल्हाधिकाऱ्यांबरोबर लवकरच बैठक
शहरालगतच्या गावांमधील नागरीकरण वाढले आहे. गावामध्ये अनेक मोठ्या सोसायट्या तयार झाल्या आहेत. मात्र, वाढत्या नागरीकरणाच्या प्रमाणात या गावांना पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सदस्यांनी केलेल्या तक्रारीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पाणीटंचाईच्या काळामध्ये नागरिकांची गैरसोय होईल असे निर्णय घेऊ नये, असेही आदेश दिले आहेत. शहरालगतच्या गावांची पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना दिले. - विश्वास देवकाते,
अध्यक्ष, जिल्हा परिषद

केवशनगर या भागामधील नागरीकरण वाढले आहेत. मात्र, त्या प्रमाणात पाणी दिले जात नसल्याची आमची तक्रार आहे.
- वंदना कोद्रे, जि़ प़ सदस्या

Web Title: The villages also get water without paying money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.