गावोगावी 'जल'जागृती

By admin | Published: March 18, 2016 03:03 AM2016-03-18T03:03:47+5:302016-03-18T03:03:47+5:30

सतत कमी पडणारा पाऊस... धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा... अशी स्थिती सातत्याने राज्यभरात असल्यामुळे आता सर्व शासकीय खात्यांमार्फतच जलजागृती अभियानाचा

The villages 'Jal' awareness | गावोगावी 'जल'जागृती

गावोगावी 'जल'जागृती

Next

- महेंद्र कांबळे,  बारामती
सतत कमी पडणारा पाऊस... धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा... अशी स्थिती सातत्याने राज्यभरात असल्यामुळे आता सर्व शासकीय खात्यांमार्फतच जलजागृती अभियानाचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल, कृषी आणि जलसंपदा खात्याकडे प्रामुख्याने सोपविली आहे.
ाागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्तच घटले. धरणांमध्येदेखील पाणी साठले नाही. शेती, पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांसाठी पाणी, असे नियोजन करताना जलसंपदा खात्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना पश्चिम महाराष्ट्रातदेखील दिवसेंदिवस पाण्याची भूगर्भातील पातळी खालावत आहे. कालव्यांची आवर्तने लांबली आहेत. धरणांमध्ये पाण्याचा साठा कमी होत आहे. जवळपास ४ जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या उजनीसारख्या मोठ्या धरणांचा पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे आता जलजागृती अभियानाच्या माध्यमातून पाणीबचतीची मोहीम राज्य सरकार राबविणार आहे.
सध्या उजनीचा उपयुक्त साठा वजा १४.७४ टक्के आहे. तर, एकूण साठा वजा २७.५७ टक्के आहे. आणखी ३ महिने शिल्लक पाण्यासाठी तग धरावा लागणार आहे. उजनीचे पाणी शेतीसाठी सोडणे बंद करण्यात आले आहे. जलसंपदा, कृषी, महसूलसह सर्व शासकीय, निमशासकीय खात्यांना या जलजागृती अभियानासाठी राज्य शासनाने फतवाच काढला आहे. त्यानुसार जलसंपदा खात्यामार्फत दि. १६ ते २२ मार्चदरम्यान अभियान राबविले जाणार आहे. जलजागृती अभियानात पिकांसाठी पाणी देण्याची पद्धत बदलणे, पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनचा अधिकाधिक वापर, पाण्याचा पुनर्वापर करणे, यांसह इतर उपाययोजना करण्यासाठी जलजागृती केली जाणार आहे.

200 ते 250 फुटांपर्यंत खोदलेल्या विंधन विहिरींचे पाणी आटले असून विहिरी कोरड्या पडल्या अवस्थेत आहेत. कालव्यांची आवर्तने लांबली आहेत. दुष्काळाची अशी भीषण परिस्थिती डोळ्यासमोर असताना पहिल्यांदाच जलजागृतीसाठी जलसंपदा खात्याला पुढाकार घ्यावा लागला आहे. राज्य सरकारने यापूर्वी
मोठी धरणे बांधण्यापेक्षा नाले, नदी, ओढे आदींचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याचा कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर पाझर तलावातील गाळ उपसण्याची मोहीम राबविली आहे. आता राज्यात गावोगावी जलजागृतीची मोहीम राबणार आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह लोकांचा सहभाग, शेतकरी मंडळांचा सहभाग घेतला जाणार आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि. बा. जाधव, उपविभागीय अभियंता ए. आर. भोसले यांनी दिली.

Web Title: The villages 'Jal' awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.