लोकसहभागातून गावे झाली पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:17 AM2017-08-09T03:17:31+5:302017-08-09T03:17:34+5:30
पानी फाउंडेशनच्या वतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेचा निकाल रविवारी बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुलामध्ये जाहीर करण्यात आला. यात पुरंदर तालुक्यातील तीन व इंदापूर तालुक्यातील तीन गावांनी तालुका स्तरावर क्रमांक पटकावला. यातील पहिल्या आलेल्या इंदापूरच्या घोरपडवाडी व पुरंदरच्या पोखरी गावांत जाऊन ‘लोकमत’ने पाहणी केली. यात या गावांची दुष्काळी ओळख आता पुसणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वॉटरकप स्पर्धेत घोरपडवाडी इंदापूरमध्ये प्रथम
शैैलेश काटे
इंदापूर : सर्वांना एकत्र आणून काम करण्यावरच भर दिल्यामुळे वॉटरकप स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी ही ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावणारी ठरली.
तालुक्यातील सराफवाडीनजीकची वालचंदनगरला जवळ करणारी, एक छोटी ग्रामपंचायत. दर उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरची अव्याहत मागणी करणारे गाव म्हणून घोरपडवाडीचा तालुक्याला परिचय होता. तो या पुरस्काराने पुसला गेला. १ हजार ४०१ ही या गावची लोकसंख्या, १ हजार ५३ ही मतदारसंख्या. तीन प्रभाग, सात ग्रामपंचायत सदस्यसंख्या. सुमारे साठ टक्क्यांपर्यंत धनगर समाजाची वस्ती. मका, ऊस, डाळिंब, गहू, हरभरा, ज्वारी ही इथली प्रमुख पिके. चोपन्न व पंचावन्न क्रमांकाच्या फाट्यांवरून गावाला शेती सिंचनासाठी पाणी मिळते. पण त्यातही लहरी पावसासारखी अनियमितता आहे. नंदा तुकाराम कांबळे या सरपंच म्हणून काम पाहत आहेत.
सन २०१६-१७ मध्ये बारामतीच्या अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रमुख सुनंदा पवार यांनी या गावाला दत्तक घेतलं. ट्रस्टच्या माध्यमातून गावातील पहिल्या क्रमांकाच्या तलावातील गाळ काढून सुमारे दहा फुटाचे खोलीकरण करून घेतले. शरद पवार यांच्या सेस फंडातून सात लाख रुपये खर्चून सांडवा बांधला. त्यामुळे टँकर मागणीच थांबली. कसलीही सरकारी योजना सुरू होण्याआधी वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी जनजागर केला. गावाला वृक्षारोपणाची सवय लावली. त्यामुळे गावाला नवी जाणीव मिळाली.
वॉटरकप स्पर्धेच्यानिमित्ताने सरपंच नंदा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अण्णा धालपे, सामाजिक कार्यकर्ते मारुती नाचण, तुकाराम जिजाबाई कांबळे, नितीन मारुती कुचेकर, दीपक कुंडलिक नाचण, किरण धालपे, केशव पिसे, हनुमंत लंबाते आदींनी गावातील ग्रामस्थांमध्ये या स्पर्धेविषयी जनजागृती केली. शाश्वत पाण्यासाठी सामुदायिक कष्ट महत्त्वाचे आहेत, हे पटवून दिले. त्यामुळे अक्षरश: सकाळी सात वाजता गावकरी श्रमदानासाठी तयार होऊ लागले.
स्पर्धेच्या काळात ८ हजार ३७५ घनमीटर एवढे नालाबंडिंगचे काम झाले. १ लाख २४ हजार घनमीटर यांत्रिक काम झाले. नांदेड पॅटर्नचे ११६ शोषखड्डे झाले. वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांनी १ हजार २७५ खड्डे घेतले. त्यासाठी अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने वेगवेगळ्या प्रकारची झाडे उपलब्ध करून दिली. तलावातील कामांसाठी शांतिलाल मुथ्था यांच्या ट्रस्टने यंत्रे पुरवली. गावकºयांनी या कामाचे अचूक व तंतोतंत रेकॉर्ड ठेवल्याने, कामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या समित्यांनी पारदर्शक तपासणी केली आणि गावाला बक्षीस मिळाले.
‘लोकमत’शी बोलताना ग्रामपंचायत सदस्य अण्णा धालपे, सामाजिक कार्यकर्ते मारुती नाचण यांनी सांगितले, की गावामधून एकूण सहा तलाव जातात. त्यातील एकाचे काम पूर्ण झाल्यामुळे टँकरची मागणी थांबली. उर्वरित तलावांची गाळ काढणे व खोलीकरणाची कामे झाल्यानंतर पाणी समस्या कायमची सुटेल.
वॉटरकप स्पर्धेत पोखर पुरंदरमध्ये प्रथम
सुनील लोणकर
गराडे : पावसाळ््यात खूप पाऊस पडल्याने पाणीच पाणी, तर उन्हाळ्यात गाव कोरडेठाक... पाण्यासाठी वणवण असल्याने गावात मुली देण्यासही कोणी सहजासहजी तयार होत नसत... पण पुरंदर तालुक्यातील पोखर गावची परिस्थिती बदलली आहे, पानी फाउंडेशन व शासनाच्या पुढाकारातून.
सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत या गावाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. गावाने पाणी फाउंडेशनचे १० लाख व महाराष्ट्र शासनाचे ८ लाख रुपये इतके बक्षीस मिळविले. साकुर्डे गावाने द्वितीय क्रमांक मिळवून महाराष्ट्र शासनाचे ७ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. वाघापूर गावाने तृतीय क्रमांक पटकावून महाराष्ट्र शासनाचे ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळविले.
पुरंदर किल्ल्याच्या डोंगररांगेत दुर्गम ठिकाणी वसलेले पोखर गाव ऐतिहासिक आहे. गावचे क्षेत्रफळ २०३ हेक्टर असून लोकसंख्या २५४ इतकी आहे. पावसाळ्यात खूप पाऊस, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी. परंतु उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई. शेतीला सोडा, परंतु पिण्याच्या पाण्याची भयंकर वानवा असते.
पानी फाउंडेशनचे समन्वयक सुरेश सस्ते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पाणीटंचाईवर मात करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले. प्रथमत: सर्व महिलांनी यामध्ये आघाडी घेतली. प्रचंड मेहनत घेऊन श्रमदान केले.
ग्रामस्थांची एकी पाहून जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दौलत देसाई, पुरंदरचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, शासकीय पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक संघटना, तसेच इतर विविध संघटना यांनी श्रमदान करीत आर्थिक मदत केली.
सर्व ग्रामस्थांना माणसी ६०० घनमीटर मनुष्यबळाच्या साहाय्याने आणि १५० घनमीटर यांत्रिक मदतीने काम करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात त्यांनी माणसी १५०० घनमीटर आणि यांत्रिक मदतीने ४८ हजार घनमीटर इतके काम केले. त्यामुळे गावची परिस्थिती आता बदलली आहे.
पुरंदर तालुक्यातील एकूण ९० ग्रामपंचायतींपैकी सुमारे ३४ ग्रामपंचायतींमधील सदस्यांनी ४ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. सुरेश सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तुकड्यांमध्ये हे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण मॅनेजर भगवान केशवट, व्यवस्थापक सतीश मुळीक, अमिर पाटील, नवनाथ शिंदे, सुरेखा फाळके, हिरावती दारुंडे, भारती फाळके, अक्षय बनकर यांनी सदस्यांना जलव्यवस्थापनाचे धडे दिले होते.
पोखर गावचे उपसरपंच
प्रवीण पोमण, उत्तम पोमण, संदीप पोमण ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘‘पानी फाउंडेशनच्या माध्यमातून पोखर परिसरातील सर्व बंधारे भरले आहेत.
पोखरच्या शेतशिवारात सर्वत्र पाणी खेळत आहे. शेतपिकेही उत्तम आली आहेत. उन्हाळ्यातही आता पाणीटंचाई जाणवणार नाही. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ही चळवळ पुढे चालूच ठेवणार आहे.