दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा - विनय हर्डीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:14 AM2019-02-04T03:14:52+5:302019-02-04T03:14:56+5:30

मराठी माणसाला मागे वळून पाहायला आवडते, पुढे नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे लेखन मराठी लेखक करत नाहीत. स्मरण रंजनात रमणाऱ्या दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा, असे परखड मत साहित्यिक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.

 Vinay Hardikar news | दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा - विनय हर्डीकर

दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा - विनय हर्डीकर

Next

पुणे -  मराठी माणसाला मागे वळून पाहायला आवडते, पुढे नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे लेखन मराठी लेखक करत नाहीत. स्मरण रंजनात रमणाऱ्या दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा, असे परखड मत साहित्यिक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा (२०१८) पारितोषिक वितरण समारंभ विनय हर्डीकर यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मसापचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक वि. दा. पिंगळे उपस्थित होते.
या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नाकर पारितोषिक’ ‘ग्राहकहित’ या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक’ ‘वाघूर’ या दिवाळी अंकाला, ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’ ‘अक्षरधारा’ या दिवाळी अंकाला, ‘शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’ ‘दक्षता’ या दिवाळी अंकाला, त्याचबरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट आॅनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘बिगुल’ या दिवाळी अंकाला, ‘जानकीबाई केळकर’ स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालवाङ्मय दिवाळी अंकाचे पारितोषिक’ ‘विद्यार्थी’ या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ ‘चपराक’ या दिवाळी अंकातील विद्या बायास ठाकूर यांच्या ‘सुमी’ या कथेला तसेच उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ ‘कलासागर’ या दिवाळी अंकातील शिरीष पदकी यांच्या ‘ग्रीक सॅलेड व ग्रेसच्या कविता’ या लेखाला विनय हर्डीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तसेच दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचविणे हे वितरक आणि विक्रेत्यांचे योगदान लक्षात घेऊन पूनम एजन्सी, संदेश एजन्सी, रोहिणी बुकडेपो, उत्कर्ष आणि रसिक या प्रमुख विक्रेते व वितरकांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.
वि. दा. पिंगळे यांनी
प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. उद्धव
कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

दिवाळी अंक व्यापक व्हायला हवा
हर्डीकर म्हणाले, दिवाळी अंक ही केवळ साहित्यिकांची मिरासदारी नाही. साहित्याचे वर्तुळ मर्यादित आहे, ते व्यापक होणे गरजेचे आहे. दिवाळी अंकात लेखक बांधिलकी म्हणून लिहितात, संपादक बांधिलकी म्हणून अंक काढतात या पलीकडे जाऊन अर्थकारणाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
जोशी म्हणाले, दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकांत तेच ते लेखक वर्षानुवर्षे लिहीत असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे.

Web Title:  Vinay Hardikar news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे