अर्थकारणात राजकारण नाही : विनय सहस्त्रबुद्धे; नोटाबंदीचे समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 04:28 PM2017-11-08T16:28:06+5:302017-11-08T16:33:03+5:30
विमुद्रीकरणाच्या वेळीस सहकारी बँकांनी जमा केलेला पैसा काही काळ गोठवला गेला, मात्र असे का केले त्याचा खुलासा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानेच करावा, असे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
पुणे : भारतीय जनता पार्टी अर्थकारणात कधीही राजकारण आणत नाही. विमुद्रीकरणाच्या वेळीस सहकारी बँकांनी जमा केलेला पैसा काही काळ गोठवला गेला, मात्र असे का केले त्याचा खुलासा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियानेच करावा, असे भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
विमुद्रीकरणाच्या (नोटाबंदी) निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त विरोधी पक्षांनी काळा दिवस पाळला आहे. भाजपाच्या वतीने त्यांच्या विरोधात देशभरात काळा पैसा विरोधी दिन साजरा करण्यात येत आहे. शहर भाजपाने त्यासाठी आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन करीत विरोधकांवर टीका केली. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा आमचा विचार नाही असे ते म्हणाले.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक फायदे झाले. देशाच्या अर्थनितीला कसलीही शिस्त नव्हती. ती शिस्त या निर्णयामुळे आली. डिजीटल व्यवहारांमुळे काळ्या पैशाच्या वापरावर निर्बंध आले. काश्मिरमधील दगडफेक थांबण्यापासून ते बनावट कंपन्या बंद करण्यापर्यंत अनेक गोष्टी झाल्या आहेत. मात्र विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. त्याला उत्तर द्यायचे म्हणून भाजपाने देशभर काळा पैसा विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ भाजपाला माघार घ्यावी लागली असा होत नाही असे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
नोटाबंदी, त्यानंतर डिजीटल व्यवहार, रेरा कायदा यासारखे काही निर्णय घेण्याची गरजच होती. सुरूवातीच्या काळात त्याचा त्रास होणार हे दिसत असतानाही त्यामुळेच निर्णय घेण्यात आले. हे निर्णय वेगवेगळे पाहिले तर त्याचा एकसंध फायदा काय झाला ते दिसत नाही. मात्र आता तो दिसू लागला आहे. ज्यांना काळ्या पैशात, त्याची निर्मिती होण्यात रस आहे तेच अपप्रचार करीत आहेत, मात्र जनतेला आता फायदा दिसू लागला आहे असा दावा सहस्त्रबुद्धे यांनी केला.
नोकर्या कमी झाल्या हाही अपप्रचार आहे. देशात किती रोजगार निर्माण झाला याची आकडेवारी तयार करणारी कंपनी आहे. त्यांच्या सर्वेक्षणानुसार सर्व क्षेत्रात चांगला रोजगार निर्माण झाला आहे. खोटे उद्योग, करबुडवगिरीसाठी स्थापन केलेल्या कंपन्या बंद झाल्या याचा अर्थ रोजगार बंद झाला असा होत नाही. उलट स्टार्ट अप, मेक इन इंडिया यासारख्या योजनांमुळे उद्योजकतेला चालना मिळून रोजगारनिर्मिती होत आहे असे सहस्त्रबुद्धे म्हणाले.
खासदार अनिल शिरोळे, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यावेळी उपस्थित होते. पक्षाचे खजिनदार प्रा. विनायक आंबेकर यांनी लिहिलेल्या नोटाबंदीची वर्षपुर्ती या पुस्तिकेचे प्रकाशन सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले.
हा अपप्रचार
नोटाबंदीमुळे शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या, लघूउद्योजक, व्यापारी यांचा व्यवसाय कमी झाला हा सगळाच अपप्रचार आहे असे सहस्त्रबुद्ध म्हणाले. काळ्या पैशांच्या विरोधात स्थापन केलेल्या एसआयटी ने (स्पेशन इनव्हिस्टींग टीम) तपास करून आतापर्यंत सात अहवाल दिले, मात्र त्यानुसार काय कारवाई झाली ते सांगा असे विचारले असता सहस्त्रबुद्धे यांनी त्याची आकडेवारी आत्ता उपलब्ध नाही असे सांगितले.