तळजाई टेकडीवर येणार वेलींचा बहर, दुर्मीळ वेलींची केली लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:59+5:302021-07-02T04:08:59+5:30
गेल्या काही वर्षांपासून मोठ्या शहरांमध्ये टेकड्यांवरील महावेली नष्ट झाल्या आहेत. त्याविषयी नागरिकांना माहिती देखील नसते. वेली बागेत, गच्चीत, घरात ...
गेल्या काही वर्षांपासून मोठ्या शहरांमध्ये टेकड्यांवरील महावेली नष्ट झाल्या आहेत. त्याविषयी नागरिकांना माहिती देखील नसते. वेली बागेत, गच्चीत, घरात आशा ठिकाणीच मर्यादित राहिल्या. महावेली या मोठ्या परिसंस्था आहेत. अनेक कीटक, भुंगे, मुंग्या, पक्षी या वर अवलंबून असतात. वृक्षांप्रमाणे वेलीमुळे वातावरण चांगले राहते. वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागातील हिरवेवाडीतील ग्रामस्थांनी मदत केली असून, त्यांनी डोंगरातील ७ महावेली शोधून आणल्या आणि त्या शहरात लावण्यासाठी दिल्या. ज्यामध्ये गरुड वेल, गेट वेल, पोतपोलिन, कावली, शेंड वेल, बुसरंग, गारंबी यांचा समावेश आहे. या वेलीचे रोपण लोकेश बापट आणि संकेत जोगळेकर यांनी तळजाई टेकडीवर केली. त्यांना वनस्पती तज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी मार्गदर्शन केले. अजून काही वेलींची माहिती काढून ते शोधून लावण्यात येणार आहेत.
——————-
गारंबी सर्वात मोठी वेल
गारंबीचा महावेल अनुकूल परिस्थितीमध्ये दररोज सुमारे एक फूट (२५ सें.मी.) उंच वाढू शकतो. ही किमया वृक्षराजीमध्ये फक्त बांबूच्या प्रजातीमध्ये दिसून येते. गारंबीची शेंग देखील खूप मोठी होते. कांचनवेल तर खूप मोठी आणि मजबूत असते. तिच्या फांद्यांचे झोके खेळता येतात.
वेलींचा उपयोग
- काही वेलींची पाने, फुले, बिया, कंद यांचा कच्ची खाण्यासाठी होतो. त्याची कोशिंबिर, भाजी, भजी, चटणी केली जाते.
- आकर्षक फुलांसाठी काही वेलींचा उपयोग होतो. सुवासिक फुलेही येतात.
- पर्णशोभिवंत व भिंती हिरव्या करण्यासाठी, कुंपन म्हणून देखील वेलींचा उपयोग होतो.
- अनेक घरांच्या समोरील छत हिरवे करण्यासाठी वेली लावल्या जातात.
- वेलींचा औषधी उपयोग देखील आहे.
-------------