राज्यातील द्राक्षबागायतदार केंद्राच्या धोरणाने अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:13 AM2021-02-13T04:13:17+5:302021-02-13T04:13:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : निर्यातीसंदर्भात केंद्र सरकारने स्वीकारलेले धोरण राज्यातील द्राक्ष बागायतदारांना त्रासदायक होत असल्याची तक्रार द्राक्षबागायतदार संघाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : निर्यातीसंदर्भात केंद्र सरकारने स्वीकारलेले धोरण राज्यातील द्राक्ष बागायतदारांना त्रासदायक होत असल्याची तक्रार द्राक्षबागायतदार संघाने केली आहे. यात राज्य सरकारने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी संघाने केली आहे.
कोरोना तसेच अतिवृष्टीसारखी नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच द्राक्षशेती अडचणीत आली आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच त्यांची आर्थिक गणिते निर्यातीवर अवलंबून असतात. अजूनही अनेक देशांमधील विमानवाहतूक कोरोनामुळे बंद आहे. उड्डाणे कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांनी भाडे दीडपट वाढवले आहे. कंटेनरचीही भाडेवाढ केली आहे, अशी माहिती संघाचे खजिनदार कैलास भोसले यांनी दिली.
यात भर म्हणून की केंद्र सरकारने निर्यातीवर यापूर्वी मिळत असलेले अनुदान अचानक बंद केले. कंटेनरसाठीही अनुदान मिळत होते, त्यावरही टाच आणली आहे. या सर्व परिस्थितीमुळे द्राक्षांसाठी एका किलोमागे उत्पादकाचा ३० रुपये खर्च वाढला आहे. परदेशात मिळणाऱ्याºदरातून तो भरून निघणे शक्य नाही. आधी कोरोनामुळे स्थानिक स्तरावर नुकसान झाले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे तयार होत असलेल्या द्राक्षांचे घड नुकसानीत गेले. जे घड राहिले त्यातील द्राक्षमण्यांना तडे गेले. या नुकसानीत वाचण्यासाठी निर्यात हा चांगला पर्याय होता, तर तिथे केंद्र सरकारने अडचणी निर्माण केल्या आहेत, असे भोसले म्हणाले.
संघाच्या वतीने लवकरच राज्य सरकारमधील मंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात भेट घेणार आहे. केंद्र सरकारमधील निर्यातविषयक अधिकाऱ्यांबरोबरही संपर्क साधण्यात येत आहे. अनुदान पूर्ववत सुरू करावे, कंटेनर, विमानवाहतूक यातील भाडेवाढ कमी करावी, अशा मागण्या त्यांच्याकडे करण्यात येत आहेत, अशी माहिती भोसले यांनी दिली.