विंटेज कार ट्रॉफी 'फोर्ड व्ही ८' या गाडीला; विंटेज व क्लासिक कार्स, बाईक रॅलीला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

By नितीश गोवंडे | Published: April 9, 2023 06:38 PM2023-04-09T18:38:22+5:302023-04-09T18:41:19+5:30

पुणेरी पगडी घालून पारंपारिक वेशामध्ये काही कार्सचे मालक या रॅलीत सहभागी

Vintage Car Trophy to Ford V8 Pune residents overwhelmingly responded to vintage and classic cars, bike rally | विंटेज कार ट्रॉफी 'फोर्ड व्ही ८' या गाडीला; विंटेज व क्लासिक कार्स, बाईक रॅलीला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

विंटेज कार ट्रॉफी 'फोर्ड व्ही ८' या गाडीला; विंटेज व क्लासिक कार्स, बाईक रॅलीला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

googlenewsNext

पुणे : तरुणाईमध्ये जुन्या गाड्यांचे असलेले आकर्षण.. सेल्फीसाठी लागलेली चढओढ.. गाडी चालण्यासाठी सज्ज झालेले ज्येष्ठ नागरिक आणि रॅली दरम्यान नागरिकांनी केलेले उस्फुर्त स्वागत अशा उत्साहात विंटेज व क्लासिक कार्स, बाईक रॅलीला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. पुण्याचे पहिले महापौर कै. बाबुराव सणस यांच्या स्मृती प्रित्यर्थ विंटेज कार ट्रॉफी रवी अवेलु यांच्या फोर्ड व्ही ८ या गाडीला तर क्लासिक कार पुरस्कार योहान पुनावाला यांच्या १९४८ च्या बेंटल मार्क व्हीआय या गाडीला देण्यात आला.

विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया आणि रेस कोर्स टर्फ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विंटेज अँड क्लासिक कार्स, मोटारसायकल व स्कूटर रॅलीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे फ्लॅग ऑफ आणि पारितोषिक वितरण माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह-पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरडब्ल्युआयटीसीचे अध्यक्ष सुरेंद्र सणस, विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया क्लबचे चेअरमन नितीन डोसा, रॅलीचे आयोजक व म्युझियमचे सुभाष सणस, योहान पुनावाला, झहीर वकील, धनंजय बदामीकर, वि.सी.सी.आयचे पदाधिकारी व विंटेज कार्सचे मालक उपस्थित होते.

ही रॅली रेसकोर्स टर्फ क्लब येथून सुरुवात होऊल गोळीबार मैदान - सारसबाग - दांडेकर पुल - लाल बहादूर शास्त्री मार्ग - गरवारे पूल - कृषी महाविद्यालय उड्डाणपूल - जुना बाजार रोड - जिल्हा परिषद - हॉलीवूड गुरुद्वारा रोडमागे पुन्हा टर्फ क्लब येथे समाप्त झाली. या रॅली दरम्यान, प्रत्येक चौकाचौकात नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. पुणेरी पगडी घालून पारंपारिक वेशामध्ये काही कार्सचे मालक या रॅलीत सहभागी झाले होते.

या विंटेज वाहनांचा समावेश..

या रॅलीत अतिशय मौल्यवान जुन्या ७० ते ८० विंटेज व क्लासिक कार्स आणि सुमारे ३० ते ४० विंटेज स्कूटर्स व मोटारसायकल्स सहभागी झाल्या होत्या. या रॅलीमध्ये बॉलीवूड आणि हॉलीवूड स्टार्सच्या व्हिंटेज आणि क्लासिक गाड्या, सुभाष सणस यांच्या मालकीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वापरलेली कन्व्हर्टेबल इंपाला, हॉलिवूड स्टार अल पचिनो यांची मर्सिडीज बेंझ, अमिताभ बच्चन यांची व्हाइट मर्सिडीज, विनोद खन्ना यांची २ डोअर सिल्व्हर कलर मर्सिडीज व इतर सेलिब्रिटीज यांच्या विंटेज कार्स तसेच ‘बॉबी’ फेम राजदूत मोटारसायकल अशा अनेक वाहनांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, पेबल्स बीच यूएसए विजेता एल्विसची १९३३, शेखर चवरेकर यांची सर्वात जुनी कार १९१९ ओव्हर लँड, १९५६ ची डॉज, १९३८ ची सर्वात जुनी मोटारसायकल नॉर्टन ५०० ही वाहने प्रदर्शित करण्यात आली होती. १९३८ सालची नॉटन फटफटी ही या रॅलीचे आकर्षण ठरली. या रॅलीतील वैशिष्ट्य म्हणजे ऑस्टिन ७ ही भारतातील सर्वात जुनी कार घेऊन शहरातील ८७ वर्षांच्या डॉ. प्रभा नेने या स्वतः सहभागी झाल्या होत्या. रोल्स रॉईस, बेंटली, मर्सिडीज बेंझ, शेवरलेट, मॉरिस कन्वर्टिबल, ऑस्टिन, फोर्ड व इतर फॉरेन कार्स यांचा यात समावेश होता. धनंजय बदामीकर, डहाणूकर, योहान पूनावाला, झहीर वकील, साबळे कुटुंब अशा अनेकांच्या संग्रहातील विंटेज व क्लासिक कार्स सहभागी झालेल्या होत्या. योहान पुनावाला यांच्या संग्रहातील ७ कार्स, साबळे परिवारातील ६ कार्स, सुभाष सणस यांच्या संग्रहातील १२ कार्स सहभागी झाल्या होत्या.

अन् पोलिसांची गाडी चालवली आयुक्तांनी...

सन १९८२ मधील मर्सिडीज बेंझ ३०० टी डी ही सुभाष सणस यांच्याकडे संग्रहित असलेली पोलिसांची जुनी गाडी माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतः चालवत या रॅलीचा आनंद घेतला.

Web Title: Vintage Car Trophy to Ford V8 Pune residents overwhelmingly responded to vintage and classic cars, bike rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.