प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन: पुण्यातील बजाज फायनान्स कंपनीला ८६ हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 03:23 PM2021-04-19T15:23:13+5:302021-04-19T15:55:09+5:30
वाकडेवाडी येथील बजाज फायनान्स कंपनीत महापालिका अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१९) अचानक पाहणी केली.
पुणे: कोरोना प्रादुर्भाव शहरात वेगाने वाढत आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने अनेक कठोर पावले उचलत कडक निर्बंध लागू केले आहे. या नियमांचे पालन करणे बंधनकारक असून उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाने देखील वाकडेवाडी येथील बजाज फायनान्स कंपनीवर कारवाई करत तब्बल ८६ हजारांचा दंड वसूल केला आहे.
वाकडेवाडी येथील बजाज फायनान्स कंपनीत महापालिका अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१९) अचानक पाहणी केली. यावेळी कंपनीत ८६ कर्मचारी काम करत होते. तसेच त्यांनी सामाजिक अंतर देखील न पाळल्याचे निदर्शनास आले. यानुसार कंपनीला प्रति व्यक्ती १ हजार याप्रमाणे एकूण ८६ हजारांचा दंड करण्यात आला आहे. यानंतर नियम न पाळल्यास कंपनी सील केले जाईल अशी ताकीद देखील देण्यात आली आहे.
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची जोरदार मोहीम सुरू आहे.महापालिकाने आखुन दिलेल्या नियमानुसार आस्थापना चालू ठेवाव्यात अन्यथा कोविड प्रतिंबधासाठी अजुन कारवाई कठोर करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य निरीक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी दिली आहे..
या कारवाईत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनिल कांबळे,व आरोग्य निरीक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी ,किरण मांडेकर ,शिवाजी गायकवाड ,तुषार राऊत, आनंद शेंडगे ,राजेश अडागळे, प्रमोद अडागळै सहभागी होते.