कोरोना नियमांचे उल्लंघन, स्टेट बँकेवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:12 AM2021-03-10T04:12:51+5:302021-03-10T04:12:51+5:30
पुणे : सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणा-या ६३ नागरिकांवर विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ...
पुणे : सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणा-या ६३ नागरिकांवर विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासोबतच स्टेट बँक आॅफ इंडिया, टिळक रोड शाखा व अलका टॉकिज चौकामधील कार शो-रूमवरही सुरक्षित अंतर न पाळल्याने पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. सक्रिय रुग्णही वाढले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, नागरिकांकडून नियम पायदळी तुडविले जात आहेत. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त आशिष महाडदळकर यांनी स्वत: ही कारवाई केली.
या कारवाईमध्ये आरोग्य निरीक्षक सुनील मोहिते, प्रभारी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक कृष्णा अवघडे, संजय तेरेकर, किशोर थोरात, नंदकुमार म्हांगरे, विनय थोपटे, अमित घाग, अर्चना कदम, रविराज बेंद्रे, सर्व मुकादम सहभागी झाले होते.
क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील आतापर्यंत सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ, शनिवार पेठ, शाहू महाविद्यालय रस्ता परिसरात ५६९ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, २ लाख ५८ हजार ६३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
----
दहा हजार रूपयांचा दंड
क्षेत्रीय कार्यालयातर्फे सबर्बन डायग्नोस्टिक पॅथालोजी लॅबवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये महाडदळकर यांच्यासह विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश दिघे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ उजवणकर सहभागी झाले होते.