महापालिका प्रशासनाच्या नियमावलीचे उल्लंघन; पुण्यात कंपनीला ठोठावला १ लाख रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 09:24 PM2021-04-09T21:24:58+5:302021-04-09T21:25:30+5:30
महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन सर्व आस्थापनांनी करावे, अन्यथा कडक कारवाई करणार...
पुणे: पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासन कठोर पावले उचलत आहे. तसेच शासकीय, खासगी संस्था, सर्व कंपन्या यांना प्रशासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, वाकडेवाडी येथील एका खासगी कंपनीला नियमांकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडले असून महापालिकेने तब्बल ८७,०००रुपयांचा दंड ठोठावला आहे.तसेच यापुढे नियम न पाळल्यास कंपनी सील करण्यात येईल असा इशाराही दिला आहे.
वाकडेवाडी येथील कॅलिबर बिझनेस सपोर्ट सर्व्हिसेस प्रा.लि.या कंपनीची पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी(दि.९) अचानक पाहणी केली.त्यावेळी तिथे एकूण ८७कर्मचारी काम करत होते. तसेच कंपनीच्या कार्यालयात कुठलेहीब सामाजिक अंतर पाळत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कंपनीला ८७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.तसेच मास्क न वापरणाऱ्या १९जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत एकूण १ लाख १८०रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच यानंतर जर नियमांचे पालन झाले नाहीतर कंपनी सील करण्यात येईल अशी तंबी देखील देण्यात आली.
शिवाजी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त आशा राऊत म्हणाल्या, महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार आस्थापना सुरू ठेवाव्यात. अन्यथा कोविड प्रतिबंधासाठी आणखी कठोर कारवाई करण्यात येईल.
ही कारवाई शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त आशा राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली.यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आय.एस.इनामदार, सुनील कांबळे,लक्ष्मीकांत कुलकर्णी, राजेश अडागळे, शाम माने, लक्ष्मण चौधरी, तुषार राऊत, निलिमा काकडे, कविता सिसोलेकर, शिवाजी गायकवाड, शिवाजीराव नलवडे,किरण मांडेकर यांच्या पथकाने केली.