Pune: गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांकडून नियमांचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 02:57 PM2023-09-30T14:57:52+5:302023-09-30T14:58:41+5:30
परिणामी, विसर्जन मिरवणूक काही काळ रेंगाळली होती....
पुणे : विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांसमोर वादन करणाऱ्या अनेक ढोल-ताशा पथकांनी वाद्य मर्यादा ओलांडली. या पथकांना प्रमुख तीन चौकांमध्ये दहा मिनिटांच्या सादरीकरणासाठी पोलिसांनी परवानगी दिलेली असताना, अनेक पथकांनी त्याचे उल्लंघन केले. परिणामी, विसर्जन मिरवणूक काही काळ रेंगाळली होती.
दरम्यान, पुणे पोलिसांनी पथकांना ५० ढोल आणि १५ ताशा अशी वादकांची मर्यादा घालून दिली होती. अनेक पथकांनी याचे उल्लंघन केले. लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौक, लिंबराज महाराज चौक (सेवासदन चाैक), टिळक चौक या चौकात मंडळांना दहा मिनिटांचे स्थिर वादन करण्याची परवानगी देण्यात आली होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ मुख्य मिरवणुकीत दुपारी साडेचारनंतर सहभागी झाल्याने यंदा मिरवणुकीची लवकर सांगता होईल, अशी शक्यता होती. मात्र, ढोल पथकांनी चौकाचौकात वादन केल्याने मिरवणुकीचा वेग संथ झाला. त्यामुळे बेलबाग चौकातून मार्गस्थ होणारी मुख्य मिरवणूक रेंगाळली होती.
ढोल-ताशा पथकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे होते, पण उत्सवाशी सर्वांच्या भावना जोडलेल्या असतात. पुढच्या वर्षी या बाबतीत अधिक चांगले नियोजन करू. मंडळांसह नागरिकांनी सहकार्य केल्याने विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.
- रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.