Traffic Rules: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन; राज ठाकरेंच्या गाडीवर हजारोंचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 06:02 PM2022-04-29T18:02:29+5:302022-04-29T18:02:40+5:30
पुण्यात मागील वर्षभरात हजारो पुणेकरांकडून कोट्यावधीचा दंड आकारण्यात आला आहे
किरण शिंदे
पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड आकारला जातो. एकट्या पुण्यात मागील वर्षभरात हजारो पुणेकरांकडून कोट्यावधीचा दंड आकारण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाहन चालकांनी ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनाकडूनही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या गाडीवर तब्बल 7900 रुपये दंड शिल्लक आहे.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे पोलिसांना वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, कायद्याने घालून दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवू नका, स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका असे अनेक सल्ले नेतेमंडळी सार्वजनिक कार्यक्रमातून लोकांना देत असतात. परंतु आता या नेतेमंडळीच्या वाहनांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईहून पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांनी वापरलेल्या गाडीवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7900 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड आकारण्यात आला आहे. ती त्यामुळे सर्वसामान्य लोकांची वाहने अडवून दंड वसूल करणारे वाहतूक पोलीस राज ठाकरे यांची गाडी अडवून दंड वसूल करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.