सुशिक्षित घरातही महिलांवर हिंसाचार

By Admin | Published: June 28, 2017 04:17 AM2017-06-28T04:17:20+5:302017-06-28T04:17:20+5:30

विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि आता स्मार्ट सिटी होऊ पाहात असलेल्या या पुरोगामी शहरामध्ये हुंड्यांसाठी होणाऱ्या कौटुंबिक छळाच्या

Violence against women in educated houses | सुशिक्षित घरातही महिलांवर हिंसाचार

सुशिक्षित घरातही महिलांवर हिंसाचार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विद्येचे माहेरघर, आयटी हब आणि आता स्मार्ट सिटी होऊ पाहात असलेल्या या पुरोगामी शहरामध्ये हुंड्यांसाठी होणाऱ्या कौटुंबिक छळाच्या आणि हुंडाबळींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. महागड्या वस्तू, घर, गाड्या घेण्यासाठी आजही विवाहितांचा मोठ्या प्रमाणावर छळ केला जात असल्याचे वास्तव आहे. सुखी संसाराची स्वप्ने रंगवत माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी प्रवेश करणाऱ्या विवाहितांच्या पदरी दु:खाशिवाय काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. ही समस्या सुशिक्षितांच्या घरांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागली आहे.  
यासोबतच संशयातून तसेच पतीच्या विवाहबाह्य संबंधांमधूनही अशा घटना वाढल्याचे चित्र आहे. शिक्षण घेतल्यानंतर माणूस विचारांनी प्रगल्भ होतो, पण पैशांपुढे प्रगल्भता कमी पडते, असेच या कौटुंबिक छळांच्या प्रमाणावरून दिसते.
शिक्षण आणि सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विवाहितांचे प्रमाणही मोठे आहे. सुशिक्षित आणि ‘वेल सेटल्ड’ नागरिकांच्या घरांचे वासे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनी पोखरलेले आहेत. पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांच्या समस्यांच्या निवारणासाठी ‘महिला साह्य कक्ष’ आहे. या कक्षाकडे वर्षाकाठी कौटुंबिक कलहाच्या साधारणपणे एक हजाराच्या आसपास तक्रारी येतात. त्यांचे समुपदेशन करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, ज्या प्रकरणांमध्ये समझोता होत नाही, अशी प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे पाठवून गुन्हा दाखल केला जातो.
हुंड्यासाठी छळ होत असेल, तर पूर्वी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न होता; परंतु आता शहराच्या प्रत्येक भागामध्ये महिला संस्था, संघटना आणि महिला बचत गट, पोलिसांच्या महिला समित्या, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची अशा वेळी मदत घेतली जाते.
तसेच, इंटरनेटवरही भारतातील प्रत्येक कायद्याचे आणि कलमाची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.
संशयी वृत्ती, उत्पन्नावरून होणारी भांडणे, व्यसनाधीनता, पतीकडून होणारी मारहाण, माहेराहून पैसे आणण्यासाठी होणारा छळ या पारंपरिक कारणांशिवाय विवाहबाह्य संबंध, रात्री उशिरापर्यंत महिलांनी काम करणे, पत्नीचे नोकरी करणे मान्य नसणे अशा कारणांमुळेही विवाहितांवर सासरच्यांकडून अत्याचार होत आहेत. पहिले लग्न झालेले असतानाही पुरुष ही माहिती लपवून ठेवून दुसरे लग्न करतात. त्यानंतर महिलांना त्रास सुरू होतो. यातूनही महिलांचा खून, आत्महत्या अशा घटना घडतात.

Web Title: Violence against women in educated houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.