क्षणिक रागामुळेच तरुणांमध्ये वाढतोय हिंसाचार
By admin | Published: May 7, 2015 05:24 AM2015-05-07T05:24:56+5:302015-05-07T05:43:10+5:30
एक कोणतीतरी घटना घडते, माणसाचा राग अनावर होतो आणि त्या क्षणिक रागाचा परिणाम म्हणून एक भयानक कृत्य घडून जाते. ध्यानीमनी नसताना रागाच्या भरात गंभीर गुन्हा घडून जातो.
लक्ष्मण मोरे, पुणे
एक कोणतीतरी घटना घडते, माणसाचा राग अनावर होतो आणि त्या क्षणिक रागाचा परिणाम म्हणून एक भयानक कृत्य घडून जाते. ध्यानीमनी नसताना रागाच्या भरात गंभीर गुन्हा घडून जातो. आवेग ओसरल्यावर त्याची जाणीव होते. परंतु हा क्षणिक राग कोणाच्या तरी जीवावर बेतलेला असतो आणि आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो. अलिकडच्या काळात क्षणिक रागामधून घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. स्वत:वरचा संयम आणि सहनशक्ती कमी होत चालल्यामुळे क्रियेला हिंसक प्रतिक्रिया देण्याचे वाढणारे प्रमाण चिंताजनक बनत आहे.
गेल्या काही वर्षांत सर्वसामान्यांकडूनही अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडत आहेत. सुशिक्षीत नागरिकही अशा क्षणीक रागांचे बळी ठरत आहेत. विशेषत: तरुण आणि तारुण्याच्या उंबरठ्यावरील किशोरवयीनांचे प्रमाण तर लक्षणीय आहे. कधी मित्रांच्या साथीने तर कधी स्वत:च्याच रागामधून उचलेला हात घातक ठरु लागला आहे. अशीच एक घटना २५ एप्रिलला राजेंद्रनगर येथील विवेकश्री अपार्टमेंटमध्ये घडली. एकाच मजल्यावर राहणाऱ्या तरुणाने केवळ संशयावरुन त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणावर अमानुष हल्ला केला. फरशी आणि दगडाने अक्षरश: त्याला ठेचून काढले. वास्तविक, मारहाण करणारा आणि मार खाणारा या दोघांचेही कोणतेही गुन्हेगारी स्वरुपाचे रेकॉर्ड नाही. दोघेही नोकरी करणारे तरुण आहेत. परंतु केवळ संशयावरुन बेभान झालेल्या धनंजय मोरे याने अभिजित मारणेवर प्राणघातक हल्ला केला.
दोन आठवड्यांपुर्वी पर्वतीच्या टेकडीवर एका तरुणीने प्रियकराचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. परंतु तिच्या हातून झालेला खून जाणिवपूर्वक केलेला नसून चुकून झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. लहानपणी आईवडीलांचा मृत्यू झाल्यावर काकाच्या घरी वाढलेल्या या तरुणीने अल्पवयातच समाजाचे अनेक भलेबुरे अनुभव घेतले. तिचे व्यापारी असलेल्या एका विवाहीत पुरुषाशी मैत्रीपुर्ण संबंध निर्माण झाले होते. त्याच्यासोबत रात्री पर्वती टेकडीवर फिरायला गेली असता तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्याला दूर करण्यासाठी तिने त्याला ढकलले. त्यामुळे तोल जाऊन तो मागे पडला. डोके दगडावर आपटल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अगदी सहज घडून गेलेल्या या घटनेचा तिला आता पश्चात्ताप होत आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्यामध्ये झालेल्या भांडणामधून एका पोलीस पुत्राने गरोदर स्त्रीला बेदम मारहाण करुन अत्यवस्थ केल्याची घटनाही पुणेकर विसरलेले नाहीत.
जीवघेण्या स्पर्धेमधून तणाव वाढला
४सध्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत नकार ऐकून घेण्याची सवय मोडत चालली आहे. आपली उद्दीष्टे लवकर साध्य करण्यासाठी चाललेल्या जीवघेण्या स्पर्धेमधून तणाव वाढत चालला आहे. मनाविरुद्ध एखादी घटना घडली की, संयम सुटतो. आक्रमकपणे त्यावर प्रतिक्रिया दिली जाते. अनेकदा खून, खुनाचा प्रयत्न या संकल्पना माहिती नसतानाही लहान मुलांकडून त्या घडून जातात. आपल्यामधला राग हा अचानक उद्भवलेला नसतो. तो अनेक पातळ्यांवरुन व्यक्त होत आलेलाच असतो. घरामध्ये पालक, शाळेतील शिक्षक, मित्र वेगवेगळ्या पद्धतीवर तो पहात असतात. परंतु त्यावर वेळीच उपाययोजना न झाल्याने तो एखाद्या घटनेच्या निमित्ताने अचानक उफाळून येतो.
मनावरचा संयम राखण्यासाठी मनाची शक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. योगा आणि ध्यान यासोबतच मानसोपचार तज्ञांचे समुपदेशनही आवश्यक आहे. चुका लक्षात येताच त्यावर चर्चा करणे, त्यांची बाजु समजून घेऊन संवाद साधणे आवश्यक आहे. नुसत्याच उपदेशांपेक्षा त्यांच्या चुका समजावून घेऊन सुधारणेला संधी देणे ही समाजाची जबाबदारी आहे.
- डॉ. हिमानी कुलकर्णी (मानसोपचार तज्ज्ञ)
रागाच्या क्षणी जर थोडा संयम ठेवला तर अनेक गंभीर गुन्हे टाळता येऊ शकतात. वाढत्या ताणतणावामुळे लोकांमधली सहनशीलता कमी होत चालली आहे. अन्यायाची भावना आणि जे चुकीचे चालले आहे त्याचा साठून राहीलेला राग कुठेतरी अशा गंभीर गुन्ह्यांंच्या स्वरूपाने बाहेर पडतो आहे. परंतु त्यामुळे गुन्हा करणारा आणि ज्याच्यासोबत घटना घडते अशा दोघांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. जर आपल्या स्वभावात बदल जाणवत असतील, चिडचिड वाढत चालली असेल, कोणालातरी मारण्याची इच्छा होत असेल, तर मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे, समुपदेशन करुन घेणे उपयोगाचे ठरु शकते. - अमर पोळ (बाल संस्कार केंद्र)