आबालवृद्धांमध्ये व्हायरल सर्दी, तापाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:39+5:302021-09-09T04:13:39+5:30

स्टार ११५१ पुणे : कोरोनाचे संकट कायम असतानाच आबालवृद्धांमध्ये व्हायरल सर्दी, तापाची साथ वाढली आहे. घसा दुखणे, सर्दीमुळे कानात ...

Viral cold, fever crisis in young and old | आबालवृद्धांमध्ये व्हायरल सर्दी, तापाचे संकट

आबालवृद्धांमध्ये व्हायरल सर्दी, तापाचे संकट

Next

स्टार ११५१

पुणे : कोरोनाचे संकट कायम असतानाच आबालवृद्धांमध्ये व्हायरल सर्दी, तापाची साथ वाढली आहे. घसा दुखणे, सर्दीमुळे कानात दडे बसणे, चेहऱ्याचा एकाच बाजूचा भाग बधिर होणे, अंगदुखी अशी लक्षणे नव्याने दिसू लागली आहेत. पहिले तीन-पाच दिवस अँटिबायोटिक औषधे, पाच दिवसांनी रक्ताची चाचणी आणि लक्षणे सात दिवसांहून अधिक काळ टिकल्यास कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. नाक आणि कान यांना जोडणाऱ्या नळीला सूज आल्यास दडे बसणे किंवा एक बाजू बधिर होणे अशी लक्षणे दिसल्यास कान-नाक-घसा तज्ज्ञांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. त्यातच डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या आजारांनीही डोके वर काढले आहे. हवामानातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचा त्रास वाढल्याने सर्वच छोटे दवाखाने, मोठी रुग्णालये येथील बाह्यरुग्ण विभागांमध्ये रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे, अंगदुखी अशी लक्षणे पाहायला मिळत आहेत. काहींची फ्लूची लक्षणे पाच-सात दिवसांमध्ये कमी होत आहेत, तर काही रुग्णांमध्ये तीन आठवड्यांपर्यंत लक्षणे कायम राहत आहेत. लक्षणांचे प्रकार, तीव्रता, रुग्णांचे लसीकरण, कामाचे स्वरूप अशा सर्व बाबींचा बारकाईने विचार करून डॉक्टरांकडून उपचारांची दिशा ठरवली जात आहे.

------------------------

दर वर्षी फ्लूची साथ न चुकता येतेच; त्यातच कोरोनाही अजून गेलेला नाही. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. त्याप्रमाणे एकाच वेळी फ्लू आणि कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते. मात्र, सर्व साथीच्या आजारांची लक्षणे सारखीच असतात. वास जाणे, चव न लागणे अशी लक्षणे दिसल्यास कोरोनाचे निदान होऊ शकते. फ्लूची लागण झालेल्या ८० टक्के लोकांमध्ये तीन-पाच दिवसांमध्ये लक्षणे कमी होतात. लक्षणे कायम राहिल्यास आधी डेंग्यूची चाचणी करण्यास सांगितले जाते. पाच-सात दिवसांनी कोरोनाची चाचणी सांगितली जाते. लोकांना सध्या कोरोनाची भीतीच राहिलेली नाही, असे दिसत आहे. मास्कचा वापर, गर्दी टाळणे या नियमांचे पालन कमी प्रमाणात होताना दिसत आहे.

- डॉ. अच्युत जोशी, जनरल फिजिशियन

---------------------

व्हायरल सर्दी-तापाचे संकट वाढल्याने रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढली आहे. यामध्ये लहान मुले, तरुण वर्ग, मोठी माणसे या सर्वांचाच समावेश आहे. जनरल फिजिशियनला नेहमीच्या रुग्णांची पार्श्वभूमी साधारणपणे माहिती असते. त्यामुळे लक्षणे पाच दिवसांहून अधिक काळ टिकल्यास रुग्णाने प्रवास केला आहे, त्याच्या संपर्कातील व्यक्ती आजारी आहेत का, गर्दीशी दररोजचा संपर्क आहे का, लसीचा एक डोस झाला आहे की दोन्ही झाले आहेत, याआधी कोरोना होऊन गेला आहे का हे सर्व निकष लक्षात घेऊन उपचारांची पद्धत, चाचणीची गरज ठरवली जात आहे.

- डॉ. रोहित औटी, जनरल फिजिशियन

--------------------------

कोरोना आणि कोरोनाशी संबंधित व्हायरल लक्षणे सध्या तीव्र स्वरुपात दिसून येत आहेत. नाक आणि कानाला जोडणारी नळी बंद झाल्यास कानात पाणी साठते आणि ऐकू येण्यात अडचणी येतात. विषाणूच्या संसर्गामुळे त्यात आणखी भर पडते. ही लक्षणे पूर्णपणे जाण्यास किमान तीन आठवडे लागतात. अशा वेळी कान-नाक-घसातज्ज्ञांशी त्वरित संपर्क साधावा. काही वेळा व्हायरल इन्फेक्शनमुळे मेंदूजवळच्या कानाला इजा होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर उपचार होणे महत्त्वाचे असते.

- डॉ. समीर जोशी, कान-नाक-घसातज्ज्ञ, ससून सर्वोपचार रुग्णालय

Web Title: Viral cold, fever crisis in young and old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.