अनुभवता येणार पारंपारिकतेसह आधुनिक संगीताची ‘विरासत’; कर्वेनगरमध्ये रंगणार मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:56 AM2018-02-10T11:56:16+5:302018-02-10T11:58:03+5:30
रक्ताच्या नात्यातील गुरू-शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगीताची अविस्मरणीय, अद्भुत अशी ‘विरासत’ पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
पुणे : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये गुरु-शिष्य परंपरा दीर्घकालीन आहे. सांगीतिक घराण्यांसह एकाच घरातील, रक्ताच्या नात्यातील गुरू आणि शिष्य यांचे या सांगीतिक परंपरेत एक वेगळे स्थान आहे. अशाच रक्ताच्या नात्यातील गुरू-शिष्यांच्या सुप्रसिद्ध चार जोड्यांच्या सादरीकरणातून पारंपरिकतेबरोबरच आधुनिक संगीताची अविस्मरणीय, अद्भुत अशी ‘विरासत’ पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
मिराज क्रिएशन्स आयोजित, राहुल रानडे यांची संकल्पना आणि प्रस्तुती असलेली ‘विरासत’ ही अनोखी संगीत मैफल येत्या १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता महालक्ष्मी लॉन्स, डी.पी. रस्ता, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे होत आहे.
यात रक्ताचे नाते असण्याबरोबरच गुरु-शिष्य असे नाते असलेल्या सुप्रसिद्ध अशा ८ ज्येष्ठ कलावंताचे एकाच व्यासपीठावर एकत्रितपणे सादरीकरण होणार आहे. त्यामधे ग्रॅमी पुरस्कारविजेते प्रसिद्ध घट्टम् वादक विक्कू विनायकराम व त्यांचे सुपुत्र सेल्वा गणेश आणि ज्येष्ठ वादक तौफिक कुरेशी व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन हे सुप्रसिद्ध बंधू; शिवाय प्रसिद्ध वादक लुई बँक्स-जिनो बँक्स ही पिता-पुत्रांची जोडी, कर्नाटकाचे प्रसिद्ध व्हायोलीनवादक गणेश- कुमरेश हे दोघे भाऊ असले तरी त्यांच्यात गुरू-शिष्य नाते आहे, अशा कलावंतांचा समावेश आहे. निवेदनातही ही विरासत जपण्यात आली असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ आणि त्यांचा मुलगा केतन ही पिता-पुत्रांची जोडी करणार आहे.