वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल - ‘मंथन’साठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:10 AM2020-12-06T04:10:02+5:302020-12-06T04:10:02+5:30

क्रिकेटचं या वेगवान स्वरुपानं विराट कोहलीसारख्या ‘चँम्पियन’ खेळाडूंवर प्रचंड दबाव, ताण टाकला आहे. विराट, केन विल्यमसन, रोहित शर्मा, डेव्हिड ...

Virat's journey towards becoming the 'Don' of ODIs - for 'Manthan' | वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल - ‘मंथन’साठी

वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल - ‘मंथन’साठी

Next

क्रिकेटचं या वेगवान स्वरुपानं विराट कोहलीसारख्या ‘चँम्पियन’ खेळाडूंवर प्रचंड दबाव, ताण टाकला आहे. विराट, केन विल्यमसन, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, अँरॉन फिंच, एबीडी डिव्हिलियर्स यासारख्या खेळाडूंची ‘ब्रँड व्हँल्यू’ मोठी असल्यानं त्यांनी सतत मैदानात उतरणं, ‘स्क्रीन’वर दिसत राहणं यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल अवलंबून आहे. खेळाडूंनाही त्याचं आकर्षण आहेच. जाहिरातींची दुनिया उगवत्या सुर्याची असते. जोपर्यंत बँट बोलते तोवरच किंमत असते. साहजिकच ‘करिअर’च्या शिखरावर असताना ‘ब्रेक’ घेणं परवडत नाही. परिणामी विराटसारखे ‘चँम्पियन्स’ खूप व्यस्त झाले आहेत. शारीरिक, मानसिकदृष्ट्या कणखर राहात मैदानात सतत उच्चकोटीची कामगिरी करणं सोपं नसतं. या पार्श्वभूमीवर बारा वर्षात बारा हजार धावांचा टप्पा आणि तोही आजवरच्या इतिहासात सर्वात कमी डाव (२४२) खेळून ओलांडणं हा पराक्रम आहे.

हा टप्पा गाठताना एकदिवस क्रिकेटमधल्या सार्वकालिक महान खेळाडूंच्या पंक्तीत विराटनं मानाचं स्थान मिळवलं आहे. आता चर्चा चालू आहे ती ३२ वर्षांचा विराट आणखी किती दूरवर मजल मारणार याची. एकदिवसीय क्रिकेटमधल्या सचिनची सर्वाधिक १८ हजार ४२६ धावांची कामगिरी विराट केव्हा ओलांडणार याची. एकदिवसीय क्रिकेटमधल्या सर्वाधिक ४९ शतकांचा सचिनचा विक्रम मागे टाकण्यास विराटला फक्त ७ शतकं हवी आहेत. येत्या दोन वर्षात ही कामगिरी तो नोंदवू शकतो. विराटची बँट आत्ताप्रमाणेच बरसत राहिली तर फार तर आणखी सव्वाशे सामन्यात विराट सचिनच्या सर्वाधिक धावांचा विक्रमही सहज मागे टाकेल. आणखी सव्वाशे सामने खेळण्यासाठीची उमेद आणि धमक विराट दाखवणार का इतकाच मुद्दा आहे.

एवढी विक्रमी कामगिरी केल्यानंतर सचिन आणि विराट यांच्यात तुलना होणं स्वाभाविक आहे. ही तुलना गुणवत्तेची नाही तर सचिनचा काळ आणि विराटचे दिवस यात बदलत गेलेल्या क्रिकेट नियमांची आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता पन्नास षटकांत दोन नवे चेंडू वापरले जातात. त्यामुळं ‘रिव्हर्स स्विंग’चं वेगवान गोलंदाजांकडचं अस्त्र बोथट झालंय. पहिल्या दहा षटकात दोनच क्षेत्ररक्षक तीस यार्डाबाहेर असतात. पुढच्या तीस षटकांत चार आणि शेवटच्या दहा षटकात पाच क्षेत्ररक्षक ‘सर्कल’बाहेर असतात. फलंदाजांना मदत करणाऱ्या या नियमांमुळं चौकार-षटकारांची संख्या आत्ताच्या क्रिकेटमध्ये वाढली आहे. सचिन खेळत होता तेव्हा पहिल्या पंधरा षटकांत ‘सर्कल’बाहेर दोन आणि पुढच्या ३५ षटकांत पाच क्षेत्ररक्षक बाहेर असत. आणखी एक मोठा फरक आहे. सचिननं आयुष्यभर ज्यांना तोंड दिलं ते मुथय्या मुरलीधरन, वासिम अक्रम, ग्लेन मँकग्रा, वकार युनूस, लसिथ मलिंगा, शेन वॉर्न, वॉल्श-अँम्ब्रॉस, अँलन डोनाल्ड यांची नावं एकदिवसीय क्रिकेटमधले सार्वकालिक महान गोलंदाज म्हणून घेतली जातात. या गोलंदाजांना तोंड देत सचिननं गोळा केलेल्या धावा किमती आहेत. या दर्जाचे गोलंदाज विराटच्या वाट्याला फार अभावानं आले. अर्थात यामुळं विराटची थोरवी जराही उणावत नाही. क्रिकेटचा ‘गॉड’ डॉन ब्रँडमन यांनीच याचं उत्तर देऊन ठेवलं आहे. ते म्हणाले होते - “एका काळातला चॅम्पियन हा इतर कुठल्याही युगातला चॅम्पियनच असतो, हे मी ठामपणं सांगतो. कारण त्या-त्या काळाला अनुरुप शैली सहजपणे स्वीकारण्याची क्षमता त्याच्याकडं असतेच.” विराटचा प्रवास एकदिवसीयमधला ‘सार्वकालिक श्रेष्ठ फलंदाज’ होण्याकडं चालू असल्याची खात्री पटते ती यामुळंच.

-सुकृत करंदीकर

Web Title: Virat's journey towards becoming the 'Don' of ODIs - for 'Manthan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.