जातनिर्मूलनाचे ‘व्हर्च्युअल’ पाऊल...
By admin | Published: January 8, 2017 03:33 AM2017-01-08T03:33:22+5:302017-01-08T03:33:22+5:30
सैराट चित्रपट आठवतोय.. दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं खरं; पण त्यात आडवी आली ती ‘जात’! ‘आॅनर किलिंग’चे ते दोघे बळी ठरले आणि या चित्रपटाने समाजातील प्रखर जातीय व्यवस्थेवरच
- भावना बाठिया, पुणे
सैराट चित्रपट आठवतोय.. दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं खरं; पण त्यात आडवी आली ती ‘जात’! ‘आॅनर किलिंग’चे ते दोघे बळी ठरले आणि या चित्रपटाने समाजातील प्रखर जातीय व्यवस्थेवरच जणू प्रहार केला. आज एकविसाव्या शतकातही जातीयतेचे विष समाजात इतके खोलवर पसरविले जात आहे की, यात युवापिढीचे सामाजिक जीवनही ढवळून निघत आहे...परंतु, याच जातीय व्यव्यस्थेविरुद्ध आता सोशल नेटवर्किंग साइटवर एल्गार पुकारण्यात आला आहे. मुळात जात सामाजिक विश्वात प्रवेश करते ती आडनावातून. म्हणूनच आम्हाला नको, या आडनावातून डोक वर काढणाऱ्या फुटकळ जातीचे लेबल...आम्हीच जात खोडून काढली.. असा नारा देत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘मोहीम मानवते’च्या चळवळीतून जात निर्मूलनाच्या दिशेने ‘व्हर्च्युअल’ पाऊल टाकले आहे.
कुठली आलीय जात आणि कुठला आलाय धर्म. नवयुग मानणाऱ्यांची हीच परिभाषा. तरीही मानवता हाच खरा धर्म, हे युगानुयुगे संत महात्मे सांगत आले आहेत. या मानवतेसाठी अनेक चळवळींनी जन्म घेतला. मोठ्याप्रमाणात विचाराचं आदानप्रदानही झालं. आजही ते होत आहे; पण जात कुठे आडवी येत नाही हो? जन्माला आल्यापासून ते स्मशानभूमीपर्यंत ती पाठ सोडायला तयार नाही, हे पूर्वापार चालत आलेले चित्र आजही बदललेले नाही.
आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर चळवळींनीच समाजात विचारमंथन घडविले आहे आणि या वैचारिक घुसळणीतून अस्वस्थ प्रवाहाची दिशा बदलली आहे. कालपरत्वे चळवळींचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग बदलला अन् पाहाता पाहाता आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रसार झालेल्या सोशल नेटवर्किंग साइटवर या चळवळींची मुहूर्तमेढ रोवली गेली. यातील काही चळवळी या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याऱ्या, तर काही जाती व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या असल्या, तरी आता एक नवी चळवळ उभी राहिली आहे. ही चळवळ कोणत्या अन्यायाविरोधातली नाही, तर माणसातील हरवत चालेला मानवतेचा शोध घेणारी आहे. कोणतीही व्यक्ती त्यांच्या नावाबरोबर लावल्या जाणाऱ्या आडनावाने समाजाशी बांधला जातो. आडनावाने ठरविली जाते ती जात आणि
त्यानंतर त्या व्यक्तीची तयार केली जाते ती एक प्रतिमा; पण जर हे आडनाव नसेल तर! हाच विचार यातून मांडला जातो.
बार्शीचे सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी ‘व्हॉटस अॅप’ वर ‘सृजन व्हिलेज’ हा महाराष्ट्रातील विविध शहरातील समाजसेवकांचा गु्रप बनविला असून, या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम चालविले जातात. विचारांची देवाण-घेवाण होत असते. २४ डिसेंबर रोजी निंबाळकरांनी गु्रुपवर मानवतेसाठी काही करता येईल का, याविषयी चर्चा सुरू होती. तेव्हा मुंबईच्या किशोर कदमने एक कल्पना सुचवली. ती अशी आडनावाच्या ऐवजी आपण जर मानव लावले, तर आडनावावरून जात ठरविणे अवघड होईल. यातूनच उभी राहिली मानवतेची चळवळ.
कागदोपत्री व शाळेत जरी जात व आडनाव बदलणे अवघड असले, तरी सोशलमीडियावर व लोकांना आपण आपली ओळख मात्र मानव म्हणून करून देऊ शकतो. यातूनच महेश मानव, किशोर मानव (मुंबई) तर दत्तात्रय मानव ( बीड) अशी एक फळी तयार होत गेली. यासारख्या राज्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले आडनाव बदलून मानव असे नामकरण केले आहे. राजकारण, समाजकारण, आणि वैयक्तिक जीवनात ही जात आ़णि धर्म हा अविभाज्य घटक बनवला आहे. अनेकदा जातीय राजकारणाने समाज ढवळून निघत असताना, मानवतेची सुरू केलेली ही मोहीम कौतुकास्पद आहे.
आडनावाच्या ऐवजी मानव
सोशल मीडियावर या मोहिमेला भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आपल्या फेसबुक वॉलवरील नावात बदल केले. आडनावाच्या ऐवजी मानव लावले. याआधीही सोशल मीडियावर अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी स्वत:च्या नावाबरोबर आईचे नाव लावण्यास सुरुवात केली होती. यामध्ये अनेक कलाकारांचादेखील सहभाग होता. याबरोबरच विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी व इतर खेळाडूंनी त्यांच्या आईचे नाव असलेली जर्सी घालून मॅच खेळली होती.
प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीकडे जातीच्या चष्मेतून पाहत असतो. अनेकदा समाज जागृती करूनदेखील ती गोष्ट समाजापर्यंत पोहोचली जात नाही. या करता कोणतीही गोष्ट समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी त्यांची सुरुवात स्वत:पासून करणे गरजेचे असते, याकरिता आधी मी माझे नाव बदलेले, त्यानंतर अनेकांनी याबद्दल मला विचारणा केली. अशाप्रकारे अनेकांनी स्वत:ची नावे बदलण्यास सुरुवात केली.
- समीर चव्हाण (मानव) मुंबई
मानवाने मानवासाठी मानवासारखे राहणे गरजेचे आहे, याकरिता आम्ही ही चळवळ उभी केली आहे. समाजात दिवसेंदिवस जातिवाद फोफावत चालला आहे. मी पेशाने शिक्षक आहे. चांगले नागरिक, चांगला समाज घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची असते. जर सामाजिक बदलाची सुरुवात मी माझ्यापासून केली तर नक्कीच काही बदल घडेल.
- दत्तात्रय इंगळे (मानव)
जिथे शक्य आहे तेथे आपण आडनाव वापरणे टाळायला हवे, आमच्या या मोहिमेला सोशल मीडियावर खूप प्रतिसाद मिळाला. लोकांनी कमेंटमध्ये त्यांचे नाव बदलले, पण फेसबुक वॉलवर बदल केला नाही. तोंडी पाठिंबा सर्व देतात पण कृती मात्र तितक्या तत्परतेने करत नाही. आमच्या बाजूंनी आम्ही प्रयत्न सुरू ठेवणार आहोत समाजात नक्की बदल घडेल.
- किशोर प्रसाद (मानव)