टोमॅटोवर विषाणूचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:47+5:302021-05-26T04:11:47+5:30
लोकमत न्यूज नेटकर्व खोडद : टोमॅटोचे आगार असणाऱ्या जुन्नर तालुक्यात टोमॅटो पिकावर विषाणुजन्य रोग पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...
लोकमत न्यूज नेटकर्व
खोडद : टोमॅटोचे आगार असणाऱ्या जुन्नर तालुक्यात टोमॅटो पिकावर विषाणुजन्य रोग पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. जुन्नर तालुक्यातील येडगाव परिसरातील सुमारे १८०० एकर क्षेत्राला याचा फटका बसला आहे. टोमॅटोला विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने बाहेरून प्लॅस्टिक आच्छादन असल्यासारखे दिसते. तोडणीला आलेले टोमॅटोची अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
जुन्नर तालुक्यात दर वर्षी टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. येडगाव हे टोमॅटो उत्पादनाचे माहेरघर मानले जाते. यंदाच्या वर्षीदेखील तालुक्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली आहे. परंतु, यंदा या पिकावर एक नवीन विषाणू मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या विषाणूमुळे टोमॅटोची साल प्लॅस्टिकसारखी दिसून येत आहे.
सध्या टोमॅटो तोडणीला आली असून टोमॅटोला झालेल्या या प्रादुर्भावामुळे बाजारात ही टोमॅटो खरेदी केली जात नाहीत. येडगाव परिसरात सुमारे १७०० ते १८०० एकर क्षेत्रात शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. टोमॅटो सुमारे ५५ दिवसांची झाले आहेत. त्यात ते तोडणीला आले आहेत. शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणीला येईपर्यंत टोमॅटो बागांना एकरी २ लाख रुपये खर्च केला आहे.
शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेेले पीक या विषाणूमुळे हिरावले गेले आहे. सदोष बियाण्यांमुळेच नुकसान झाले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी येडगाव परिसरातील विषाणू बाधित टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन भेट दिली. या वेळी शेतक्यांनी दोषपूर्ण बियाण्यांमुळे फळाची साल अशी होत असल्याचे सांगितले. या नवीन विषाणूबाबतच्या उपाययोजना व संशोधन करणे गरजेचे आहे. यासंबंधी तालुका कृषी अधिकारी शिरसाठ व कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत प्रशासन पातळीवर तातडीने पावले उचलणार असल्याचे यावेळी आमदार बेनके यांनी सांगितले. आमदार अतुल बेनके यांनी सोमवारी येडगावचे उपसरपंच हर्षल गावडे, अजय नेहरकर,कृष्णा काशीद,रामदास नेहरकर, चैतन्य नेहरकर, गिरीश बांगर,गोरक्ष नेहरकर, संदीप नेहरकर,अजिंक्य नेहरकर, शिवाजी नेहरकर आदी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन टोमॅटोची पाहणी करून माहिती घेतली.
कोट
संपूर्ण वर्षाचं आर्थिक गणित टोमॅटोच्या हंगामावर शेतकऱ्यांनी आखलेले असते. अचानक उद्भलेल्या या समस्येमुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आमदार अतुल बेनके यांनी या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन संबंधीत कंपनीवर कारवाई करावी."
- अजय नेहरकर,टोमॅटो उत्पादक शेतकरी,
येडगाव, ता.जुन्नर
कोट
जुन्नर तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकावर अशाप्रकारचा प्रादुर्भाव झाला आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी कृषी सहायक किंवा माझ्या कार्यालयात तक्रार करावी.कृषी विभाग व संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत सदर नुकसानीचे पंचनामे करून घेण्याचे आदेश दिले आहेत.कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना टोमॅटो नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका घेणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.
- अतुल बेनके, आमदार, जुन्नर तालुका
कॅप्शन : येडगाव येथे टोमॅटोच्या शेतात जाऊन आमदार अतुल बेनके यांनी विषाणू बाधित टोमॅटोची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.